विमानतळावर रेड कार्पेट : ‘गार्ड ऑफ ऑनर’
वृत्तसंस्था/ निकोसिया
भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी रात्री सायप्रसला पोहोचले आहेत. सायप्रसचे राष्ट्रपती निकोस क्रिस्टोडौलिड्स यांनी विमानतळावर रेड कार्पेट अंथरून त्यांचे स्वागत केले. राष्ट्रपती निकोस हे पंतप्रधान मोदींचा हात धरत काहीवेळ चालतानाही निदर्शनास आले. विमानतळावर त्यांना ‘गार्ड ऑन ऑनर’ही देण्यात आला. त्यानंतर मोदी सायप्रसच्या लिमासोल येथे गेले. हॉटेलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी भारतीय समुदायातील लोकांची भेट घेतली. भारतीय नागरिकांशी हस्तांदोलन करत पुढे जात असताना पंतप्रधानांनी लहान मुलांशी संवादही साधला. याप्रसंगी ‘भारत माता की जय’च्या घोषणांचा गजर सुरू होता.
सायप्रसला भेट देणारे मोदी हे तिसरे भारतीय पंतप्रधान आहेत. यापूर्वी इंदिरा गांधींनी 1983 मध्ये आणि अटलबिहारी वाजपेयी यांनी 2002 मध्ये या देशाला भेट दिली होती. भारत आणि सायप्रसमधील राजनैतिक संबंध नेहमीच मजबूत राहिले आहेत, परंतु अशा उच्चस्तरीय भेटी फारच दुर्मिळ आहेत. 2018 मध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद सायप्रसला पोहोचले होते. तर 2022 मध्ये परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी सायप्रसला भेट दिली होती.
रविवारी मोदी 3 देशांच्या 4 दिवसांच्या दौऱ्यावर रवाना झाले असून ते 15-16 जून रोजी सायप्रसमध्ये असतील. 16 आणि 17 जून रोजी ते कॅनडामध्ये होणाऱ्या जी-7 शिखर परिषदेत सहभागी होतील. त्यानंतर, 18 जून रोजी क्रोएशियाला जातील. 19 जून रोजी ते भारतात परततील. या दरम्यान ते 27 हजार 745 किमीचा प्रवास करणार असल्याचे विदेश व्यवहार मंत्रालयाकडून सांगण्यात आले.









