विदेश मंत्रालयाने दिली माहिती : पाक दौऱ्याबद्दल अद्याप निर्णय नाही
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 3-5 सप्टेंबर या कालावधीत ब्रुनेई आणि सिंगापूरच्या दौऱ्यावर असणार आहेत. 3-4 सप्टेंबरपर्यंत राजे हाजी हसनल बोलकिया यांच्या निमंत्रणावर ब्रुनेईचा दौरा करणार आहेत. कुठल्याही भारतीय पंतप्रधानांचा हा पहिलाच ब्रुनेई दौरा असणार आहे. ब्रुनेई येथून पंतप्रधान मोदी हे सिंगापूर येथे पोहोचतील. सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांच्या निमंत्रणानुसार मोदींचा हा दौरा होत असल्याचे विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयसवाल यांनी शुक्रवारी सांगितले आहे.
भारताला एससीओच्या (शांघाय सहकार्य संघटना) बैठकीसाठी पाकिस्तानकडून निमंत्रण मिळाले आहे. परंतु यासंबंधी अद्याप निर्णय घेतला गेला नसल्याचे जयसवाल यांनी म्हटले आहे. बांगलादेशातील पूरसंकटासाठी भारताला जबाबदार ठरविण्याचा प्रकार काही विदेशी प्रसारमाध्यमांनी केला आहे. याप्रकरणी चुकीची माहिती सादर करण्यात आली आहे. तर भारताने मांडलेल्या वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. भारत-बांगलादेश दरम्यान जलसंपदा व्यवस्थापनासाठी डाटा आणि माहितींचे वेळोवेळी आदान-प्रदान केले जाते असे जयसवाल यांनी नमूद केले आहे.
युक्रेनकडे विविध मुद्द्यांवरून स्वत:चा दृष्टीकोन आहे, हा दृष्टीकोन युक्रेनकडून प्रसारमाध्यमांसमोर मांडला जात आहे. आम्ही द्विपक्षीय चर्चांविषयी बोलत आहोत, कारण आमच्याकडे अलिकडेच युक्रेन दौऱ्यादरम्यान झालेल्या चर्चेचाही मुद्दा आहे. युक्रेन दौरा संघर्षाच्या शांततापूर्ण तोडग्याच्या शक्यतेवर अधिक दूरदर्शी चर्चांना सुविधाजनक करण्यासोबत मजबूत द्विपक्षीय संबंधांची वाट मोकळी करणार असल्याचे विदेश मंत्रालयाकडून म्हटले गेले आहे. पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांच्यात अलिकडेच फोनवरून चर्चा झाली होती. अशाप्रकारच्या चर्चेनंतर जारी करण्यात येणारे पत्रक हे संयुक्त वक्तव्यांप्रमाणे नसते. आम्ही चर्चेचा अचूक आणि विश्वसनीय तपशील जारी केला आहे. बांगलादेशच्या विषयावर दोन्ही नेत्यांनी विस्तृत चर्चा केली असल्याचे जयसवाल यांनी नमूद केले आहे.









