वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद मोदी यांनी रशियाच अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली आहे. या चर्चेत युक्रेनचे युद्ध आणि वॅगनर बंडासंबंधीचे मुद्दे उपस्थित करण्यात आले अशी माहिती आहे. शांघाय सहयोग संघटन (एससीओ) आणि जी-20 अंतर्गत सहकार्यवृद्धी यावरही चर्चा झाली आहे.
ही चर्चा भारताच्या पुढाकाराने घडली असे रशियाने स्पष्ट केले आहे. पंतप्रधान मोदी यांनी वॅगनर गटाचे बंड आणि रशियाने त्याची केलेली हाताळणी यांची माहिती घेतली. रशियाने हे बंड मोडून काढले आहे. रशियाने या बंडखोर गटाविरोधात केलेल्या निर्णायक कृतीचे समर्थन पंतप्रधान मोदींनी केले. हे युद्ध सामोपचाराने संपावे आणि चर्चेच्या माध्यमातून समस्यांचे निवारण व्हावे, ही अपेक्षा भारताने अनेकदा व्यक्त केली आहे. तथापि, युक्रेन चर्चेसाठी तयारच नसल्याची माहिती या चर्चेत पुतीन यांनी दिली, असे भारताकडून स्पष्ट करण्यात आले.
ही चर्चा आशयसंपन्न आणि महत्वपूर्ण होती. दोन्ही देशांनी एकमेकांच्या भूमिका समजून घेतल्या आहेत. भारत आणि रशिया यांचे सहकार्य उत्तरोत्तर वृद्धिंगत होण्याच्या दृष्टीने ही चर्चा फलदायी ठरली आहे. दोन्ही नेते एकमेकांच्या संपर्कात आहेत, अशी माहिती रशियाच्या अधिकृत वक्तव्यात देण्यात आली आहे.









