पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन :
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी अहमदाबादमध्ये 85 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक मूल्याच्या अनेक रेल्वेप्रकल्पांचा शुभारंभ केला आहे. तसेच 10 वंदे भारत रेल्वेंना हिरवा झेंडा दाखविला आहे. यावेळी बोलताना भारतीय रेल्वे आधुनिकीकरणाच्या दिशेने अशाचप्रकारे गतिमान राहणार आहे आणि ही मोदींची गॅरंटी असल्याचे प्रतिपादन मोदींनी केले आहे.
विकसित भारतासाठी होत असलेल्या नवनिर्माणाचा सातत्याने विस्तार होत आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात प्रकल्पांचे लोकार्पण असून नव्या योजना सुरू होत आहेत. 2024 या चालू वर्षातील सुमारे 75 दिवसांमध्ये 11 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या प्रकल्पांचे लोकार्पण आणि शुभारंभ माझ्याहस्ते झाले आहे. मागील 10-12 दिवसांमध्येच 7 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या प्रकल्पांचे लोकार्पण तसेच शिलान्यास झाला असल्याचे मोदींनी म्हटले आहे.
आज देखील (मंगळवारी) विकसित भारताच्या दिशेने देशाने एक मोठे पाऊल उचलले आहे. या कार्यक्रमात येथे एक लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या प्रकल्पांचे लोकार्पण आणि शिलान्यास झाले आहे. यातील 85 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचे रेल्वेप्रकल्प देशाला मिळाले असल्याचे मोदी म्हणाले.
भारत एक युवा देश
भारत एक युवा देश असून येथे मोठ्या संख्येत युवावर्ग आहे. आज जे लोकार्पण झाले ते युवांच्या वर्तमानासाठी आहे, तर जे शिलान्यास झाले ते युवांच्या उज्ज्वल भविष्याची गॅरंटी देणारे आहेत. 2014 पूर्वी ईशान्येतील 6 राज्यांच्या राजधान्या रेल्वेद्वारे जोडल्या गेल्या नव्हत्या. 2014 पूर्वी देशात 10 हजारांहून अधिक मानवरहित रेल्वेफाटकं होती. तेथे सातत्याने दुर्घटना घडायच्या. 2014 मध्ये केवळ 35 टक्के रेल्वेमार्गांचे विद्युतीकरण झाले होते. रेल्वेमार्गांचे दुहेरीकरण पूर्वीच्या सरकारांच्या प्राथमिकतेत नव्हते असा दावा मोदींनी केला आहे.
रेल्वेसाठीची तरतूद सहापट अधिक
रेल्वेच विकास आमच्या सरकारच्या सर्वोच्च प्राथमिकतेपैकी एक आहे. आम्ही 10 वर्षांमध्ये रेल्वेसाठीची सरासरी तरतूद 2014 च्या पूर्वीच्या तुलनेत 6 पट अधिक वाढविली आहे. पुढील 5 वर्षांमध्ये भारतीय रेल्वेचा असा कायापालट लोक पाहतील, ज्याची कल्पना कुणीच केली नसेल. आजचा हा दिवस याच इच्छाशक्तीचा जिवंत पुरावा आहे. वंदे भारत रेल्वेंचे नेटवर्क आता देशातील 250 हून अधिक जिल्ह्यांपर्यंत पोहोचले आहे. जनभावनांचा आदर करत सरकार वंदे भारत रेल्वेंचे मार्ग देखील सातत्याने वाढवत आहे. रेल्वेचा कायापालट देखील विकसित भारताची गॅरंटी असल्याचे उद्गार पंतप्रधानांनी काढले आहेत.
अभूतपूर्व वेगाने नव्या सुधारणा
रेल्वेत आता अभूतपूर्व वेगाने नव्या सुधारणा होत आहेत. जलद प्रवासासाठी नव्या रेल्वेमार्गाची निर्मिती, 1300 हून अधिक रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण, वंदे भारत, नमो भारत, अमृत भारत यासाख्या नेक्स्ट जनरेशन रेल्वे, आधुनिक रेल्वे इंजिन आणि कोच फॅक्ट्री यामुळे 21 व्या शतकातील भारतीय रेल्वेचे चित्र बदलत असल्याचे मोदींनी म्हटले आहे.
सुमारे 350 आस्था रेल्वे
भारतीय रेल्वे आता ‘विकास अन् वारसा देखील’ या मंत्राला साकार करत क्षेत्रीय संस्कृती आणि श्रद्धेची निगडित पर्यटनाला चालना देत असल्याने मला आनंद होतोय. देशात रामायण सर्किट, गुरुकृपा सर्किट आणि जैन यात्रेकरता भारत गौरव रेल्वेगाड्या चालविल्या जात आहेत. याचबरोबर आस्था विशेष रेल्वे देशाच्या कानाकोपऱ्यातून श्रीरामभक्तांना अयोध्येत आणत आहेत. आतापर्यंत सुमारे 350 आस्था रेल्वेगाड्या चालविण्यात आल्या असून याच्या माध्यमातून 4.5 लाखाहून अधिक भाविकांनी अयोध्येत रामलल्लाचे दर्शन घेतले असल्याचे मोदींनी सांगितले आहे.