वृत्तसंस्था / नवी दिल्ली
सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीने उपराष्ट्रपतीपदासाठी तामिळनाडूतील नेते आणि महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची उमेदवारी घोषित केली आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राधाकृष्णन यांची सोमवारी भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. दोन्ही नेत्यांमध्ये काहीवेळ महत्वाची चर्चाही झाली.
राधाकृष्णन ही निवडणूक निश्चित जिंकतील, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. उपराष्ट्रपतीपद हे घटनात्मक पद असून ते अत्यंत महत्वाचे आहे. कारण उपराष्ट्रपती हे त्यांच्या अधिकारपदाच्या कार्यकाळात राज्यसभेचे अध्यक्षही असतात आणि राज्यसभेच्या अध्यक्षपदावरुन ते देशाचे प्रशासन चालविण्यास साहाय्य करत असतात. सी. पी. राधाकृष्णन हे अनुभवी नेते असल्याने ते राज्यसभेचे कामकाज कुशलतेने चालवितील, असा विश्वास राजकीय वर्तुळातून व्यक्त केला जात आहे. उपराष्ट्रपतीपदासाठी 9 सप्टेंबरला निवडणूक होत आहे. या निवडणुकीत लोकसभा आणि राज्यसभा यांचे विद्यमान खासदार मतदार असतात. दोन्ही सभागृहांमध्ये सत्ताधारी आघाडीला बहुमत आहे.
तामिळनाडूत प्रभाव वाढविण्यासाठी…
उपराष्ट्रपती पदासाठीच्या उमेदवारची निवड करण्याचा अधिकार राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सर्व घटकपक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिल्यानंतर भारतीय जनता पक्षाने सी. पी. राधाकृष्णन यांची निवड रविवारी घोषित केली. या पदासाठी अनेक नेत्यांची नावे घेतली जात होती. तथापि, भारतीय जनता पक्षाने तामिळनाडूतील नेत्याची निवड करण्यातमागे या राज्यात पक्षाची पाळेमुळे अधिक घट्ट करणे हा हेतू आहे, असे राजकीय तज्ञांचे मत आहे. या राज्यात भारतीय जनता पक्षाचे अस्तित्व नाममात्र आहे. मात्र, सी. पी. राधाकृष्णन यांनी तामिळनाडूतील कोईंबतूर लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार या नात्याने दोनवेळा निवडणूक जिंकली आहे. 1998 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा दीड लाखांहून अधिक मतांनी विजय झाला होता. तर 1999 मध्ये ते याच मतदारसंघातून 55 हजारांपेक्षा अधिक मतांनी विजयी झाले होते. मात्र, या दोन्ही निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाची अनुक्रमे अण्णाद्रमुक आणि द्रमुक या पक्षांशी युती होते. गेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची पाटी या राज्यात कोरी राहिली असली, तरी त्याच्या मतांच्या टक्केवारीत लक्षणीय वाढ झाली होती. 2026 मध्ये तामिळनाडूत विधानसभा निवडणूक होणार आहे.








