बेंगळूर-बेळगाव वंदे भारत रेल्वेला दाखवणार हिरवे निशाण
प्रतिनिधी/ बेंगळूर
बेंगळूर-बेळगाव दरम्यान वंदे भारत रेल्वेसह देशातील तीन नव्या वंदे भारत रेल्वेंचे उद्घाटन, बेंगळूर मेट्रो रेल्वेच्या यलो लाईनचे लोकार्पण आणि बेंगळूर मेट्रो रेल्वे फेज-3 च्या पायाभरणी समारंभात सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी बेंगळूर दौऱ्यावर येत आहेत. पंतप्रधान मोदी सकाळी 10:30 वाजता दिल्लीहून बेंगळूरच्या एचएएल विमानतळावर विशेष विमानाने दाखल होतील. नंतर हेलिकॉप्टरने मेख्री सर्कलजवळील हवाई दलाच्या हेलिपॅडवर पोहोचतील. तेथून 11:30 वाजता क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा रेल्वे स्थानकावर रस्तेमार्गाने जातील. येथे बेंगळूर-बेळगाव वंदे भारत रेल्वेला हिरवे निशाण दाखवतील. तसेच व्हर्च्युअल पद्धतीने श्रीमाता वैष्णोदेवी कट्रा रेल्वेस्थानक आणि नागपूर-पुणे दरम्यानच्या वंदे भारत रेल्वेलाही चालना देतील.
नंतर सकाळी 11:30 वाजता आरव्ही रोडवरील रागीगु• मेट्रो रेल्वे स्थानकावरील कार्यक्रमात मेट्रो रेल्वेच्या यलो लाईनचे लोकार्पण करतील. तसेच रेल्वेने इलेक्ट्रॉनिक सिटीपर्यंत प्रवास करतील. नंतर इलेक्ट्रॉनिक सिटीतील आयआयआयटीच्या सभागृहात मेट्रो रेल्वेच्या तिसऱ्या फेजच्या योजनेचा पायाभरणी करतील. तसेच उपस्थितांना संबोधित करतील. या तीन कार्यक्रमानंतर दुपारी नवी दिल्लीला परततील.
स्वागतासाठी जय्यत तयारी
पंतप्रधान नरेंद्र मोदी बेंगळूर दौऱ्यावर येत असल्याने त्यांच्या स्वागतासाठी भाजप नेत्यांनी जय्यत तयारी केली आहे. बेंगळूरच्या मेख्री सर्कल, चालुक्य सर्कल, संगोळ्ळी रायण्णा रेल्वेस्थानक, साऊथएन्ड सर्कल, रागीगु•, इलेक्ट्रॉनिक सिटीतील मेट्रो रेल्वेस्थानक या ठिकाणी भाजपचे नेते व कार्यकर्ते स्वागत करतील.









