वृत्तसंस्था/नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच पार पडलेल्या पॅरिस गेम्समध्ये विक्रमी 29 पदकांची कमाई केलेल्या पॅरालिम्पियन्सची गुरुवारी त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन सदर यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले. क्रीडा मंत्रालयाने शेअर केलेल्या 43 सेकंदांच्या व्हिडिओमध्ये पंतप्रधान पदकविजेत्यांशी संवाद साधण्यापूर्वी त्यांचे अभिनंदन करताना दिसतात. यावेळी क्रीडामंत्री मनसुख मांडविया आणि पॅरालिम्पिक कमिटी ऑफ इंडियाचे (पीसीआय) प्रमुख देवेंद्र झाझरिया हे देखील उपस्थित होते. व्हीलचेअरवरील नेमबाज अवनी लेखरा, जिने महिलांच्या 10 मीटर एअर रायफल (एसएच1) प्रकारात सलग दुसरे पॅरालिम्पिक सुवर्ण जिंकले आणि ज्युडोका कपिल परमार, जो या खेळातील भारताचा पहिला
पॅरालिम्पिक पदकविजेता आहे, ते पंतप्रधानांसोबत पोज देताना दिसून आले. परमार तर मोदींची पदकावर स्वाक्षरी घेताना दिसला. भारताने पॅरालिम्पिक खेळांमध्ये अभूतपूर्व सात सुवर्ण, नऊ रौप्य आणि 13 कांस्यपदकांसह 29 पदके जिंकून आपली आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी नोंदविली. पॅरालिम्पियन्स परतल्यानंतर सरकारकडून त्यांचा गौरव करण्यात आला असून क्रीडामंत्री मांडविया यांनी सुवर्णविजेत्यांना 75 लाख ऊ., रौप्यविजेत्यांना 50 लाख ऊ. आणि कांस्यविजेत्या खेळाडूंना 30 लाख रु. अशी बक्षिसे दिलेली आहेत. राकेश कुमारसह कांस्य जिंकणारी तिरंदाज शीतलदेवी यासारख्या मिश्र सांघिक स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या खेळाडूंच्या खात्यात 22.5 लाख रुपयांची भर पडलेली आहे.









