जिल्ह्यातील 222 शेतकरी सौर पंपसेटसाठी पात्र : शेतीला मिळणार पूरक पाणी
बेळगाव : विजेवर अधिक अवलंबून राहणे कमी करण्यासाठी तसेच उन्हाळ्यात विजेच्या कमतरतेवर मात करण्यासाठी सरकारने ‘पीएम कुसुम-बी’ योजना सुरू केली आहे. या योजनेसाठी बेळगाव जिल्ह्यातून सर्वाधिक शेतकऱ्यांची निवड झाली आहे. आतापर्यंत 40 हून अधिक सौर पंपसेट जिल्ह्यामध्ये बसविण्यात आले आहेत. केंद्र सरकारने पीएम कुसुम योजनेंतर्गत 2019 मध्ये शेतकऱ्यांना लाभ देण्याचे सुरू केले आहे. त्यानंतरच्या काळात या योजनेत सुधारणा करून ‘बी’ व ‘सी’ असे दोन विभाग सुरू केले. पीएम कुसुम बी अंतर्गत वीजपुरवठा नसलेल्या भागात 7.5 अश्वशक्तीपर्यंत सौरशक्ती, कृषी पंपसेट वापरण्यास शेतकऱ्यांना संधी देण्यात येत आहे. हुबळी वीजपुरवठा मंडळासह (हेस्कॉम) इतर वीज कंपन्याही या योजनेला क्रेडलद्वारे हाताळण्यासाठी गती दिली आहे.
22 सप्टेंबर 2023 पूर्वी शेती वापरासाठी विजेचा संपर्क उपलब्ध करून देण्यासाठी हेस्कॉमकडे दाखल झालेल्या अर्जांची छाननी करण्यात आली. बेळगाव जिल्ह्यातून 222 शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरले आहेत. सौरशक्ती पंपसेट शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याची जबाबदारी घेतलेल्या क्रेडलमार्फत हेस्कॉमच्या हद्दीतील बेळगाव जिल्ह्यामधून 40, धारवाड 10, गदग 1, हावेरी 11, कारवार 1, विजापूर 18, बागलकोट 28 याप्रमाणे एकूण 109 शेतकरी सौर पंपसेटचा लाभ घेत आहेत. सौर पंपसेटची योजना टप्प्याटप्प्याने देण्यात येत आहे. बेळगाव जिल्ह्यात उर्वरित शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ चालू महिन्याच्या अखेरपर्यंत करून देण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
पीएम कुसुम योजनेद्वारे शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात सौर पंपसेट देण्यात येत आहे. केंद्र सरकारचे 30 टक्के, राज्य सरकारचे 50 टक्के साहाय्यधन शेतकऱ्यांना मिळणार आहे. पात्र शेतकरी 20 टक्के रक्कम भरून योजनेचा लाभ घेऊ शकतात. बेळगाव जिल्ह्यामध्ये ऊस उत्पादन मोठ्या प्रमाणात घेण्यात येते. या पिकाला पाण्याची अधिक आवश्यकता असते. त्यामुळे शेतकऱ्यांची पाण्याला अधिक मागणी असते. अनेक शेतकरी विहिरी, कालव्याद्वारे शेतीला पाणी मिळवित असतात. मात्र विजेचा पुरवठा मुबलक होत नसल्याने शेती पिकाला आवश्यक पाणीपुरवठा वेळीच व मुबलक होत नाही. त्यामुळे उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. आता पीएम कुसुम योजनेमुळे पाण्याची समस्या दूर होणार आहे.









