पंतप्रधान बिहारमधून निधी जारी करणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या सोमवारी म्हणजेच 24 फेब्रुवारी 2025 रोजी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता जारी करतील. याअंतर्गत प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या 19 व्या हप्त्याचे 2.000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटीद्वारे जमा केले जातील. पंतप्रधान नरेंद्र मोदी 24 फेब्रुवारी रोजी बिहारमधील भागलपूर येथे जाणार असून तेथूनच या योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करतील. यासंबंधीची माहिती बुधवारी पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर देण्यात आली आहे. यापूर्वी पंतप्रधानांनी 5 ऑक्टोबर 2024 रोजी महाराष्ट्रातील वाशिम येथून 18 वा हप्ता जारी केला होता. त्यानंतर 9 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात 20,000 कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले होते.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही शेतकऱ्यांच्या हितासाठी चालवली जाणारी एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. याचा उद्देश शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणे आहे. पंतप्रधान किसान योजना 1 फेब्रुवारी 2019 रोजी सुरू करण्यात आली. या योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी 2000 रुपये तीन हप्त्यांमध्ये जमा केले जातात.









