लाभार्थींनी ई-केवायसी करणे बंधनकारक
@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पीएम किसान योजनेचा 11 वा हप्ता 31 मे रोजी शेतकऱयांच्या खात्यात येऊ शकतो. मोदी सरकारने आतापर्यंत 10 हप्ते पाठवले असून आता शेतकरी अकराव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. शेवटचा हप्ता 1 जानेवारी 2022 रोजी शेतकऱयांच्या खात्यावर जमा करण्यात आला होता. दरम्यान, योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधितांना ई-केवायसी करून घेणे आवश्यक असून यासाठी आता केवळ पुढील दोनच दिवसांचा अवधी आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला चालू आठवडय़ात आठ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी 31 मे रोजी हिमाचल प्रदेशात शिमला येथे एका कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. ते येथूनच किसान सन्मान निधीचा 11 वा हप्ता जारी करू शकतात. या निमित्ताने पंतप्रधान देशातील विविध क्षेत्रातील लाभार्थ्यांशीही बोलू शकतात.
पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत सरकार दरवषी करोडो शेतकऱयांच्या खात्यात 6 हजार रुपये पाठवले जातात. वास्तविक, ज्या शेतकऱयांकडे 2 हेक्टरपेक्षा कमी लागवडीयोग्य जमीन आहे ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेंतर्गत शेतकऱयांना वर्षातून तीनवेळा 2-2 हजार रुपयांचा हप्ता पाठवला जातो. म्हणजेच पीएम किसान योजनेंतर्गत शेतकऱयांना दरवषी 6 हजार रुपये दिले जातात.
ई-केवायसीसाठी आणखी दोनच दिवस
पीएम किसान योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी सरकारने ई-केवायसी अनिवार्य केले आहे. या सुविधेसाठी 31 मे ही अखेरची मुदत निश्चित करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत लाभार्थींनी मुदत संपण्यापूर्वी ई-केवायसी करून घेण्याचा प्रयत्न करावा. ई-केवायसी न केल्यास पैसे अडकू शकतात.









