
प्रतिनिधी /पणजी
पंतप्रधान गरीब कल्याण व इतर केंद्रीय योजनांच्या गोव्यातील विविध लाभार्थींशी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी संवाद साधला तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाभार्थींना मार्गदर्शन केले.
गोव्यात गरीब कल्याण योजनेचे सुमारे 6 लाख तर किसान सन्मान निधी योजनेचे 60,000 लाभार्थी असल्याचा दावा डॉ. सावंत यांनी केला. त्यांनी केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती देऊन त्यांचे लाभही सांगितले. काही लाभार्थींनी त्यांचे अनुभव नमूद केले आणि त्याचा फायदा झाल्याची माहिती दिली.
केंद्रातील मोदी सरकारला 8 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल गोव्यात पणजी व मडगाव येथे या संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पणजी येथील इन्स्टिटय़ूट मिनेझिस ब्रागांझा हॉलमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. केंद्रातील सरकारला 8 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने सर्व राज्यात गरीब कल्याण संमेलनाची आखणी करण्यात आली होती. पणजीतील कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. सावंत तर केंद्रीय पर्यटनमंत्री श्रीपाद नाईक, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, मच्छिमार मंत्री निळकंठ हळर्णकर, आमदार प्रेमेंद्र शेट व इतर उपस्थित होते.
केंद्रातील 9 मंत्रालयाच्या एकूण 16 योजनांचा समावेश या कार्यक्रमात करण्यात आला होता. गोव्यात पंतप्रधान मातृ वंदना, गरीब कल्याण योजना, उज्वला योजना, आवास योजना अशा विविध योजनांचे लाभार्थी असल्याची माहिती डॉ. सावंत यांनी दिली.









