प्रतिनिधी/ बेंगळूर
चांद्रयान-3चे चंद्रावर यशस्वीपणे लँडिंग केल्याबद्दल इस्रोच्या शास्त्रज्ञांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी सकाळी इस्रोच्या वैज्ञानिकांची भेट घेऊन अभिनंदन करण्यासाठी बेंगळूरला पोहोचणार आहेत.
बुधवारी सायंकाळी चांद्रयान-3 चंद्रावर सुरक्षितपणे उतरले होते. त्यावेळी ब्रिक्स परिषदेसाठी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान मोदींनी तेथूनच चांद्रयानचे लँडिंग होतानाचे थेट प्रक्षेपण पाहिले. तसेच तेथूनच इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांना फोन करून अभिनंदन केले होते. नंतर ते ग्रीसला गेले होते. ते तेथून थेट शनिवारी सकाळी 5:55 वाजता बेंगळूरच्या एचएएल विमानतळावर दाखल होतील. अर्धा तास विमानतळावर विश्रांती घेऊन 6:30 वाजता ते इस्रोच्या मुख्य केंद्राला भेट देतील तसेच एस. सोमनाथ आणि इतर शास्त्रज्ञांचे अभिनंदन करून त्यांच्याशी संवाद साधतील.
मोदींच्या बेंगळूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. विमानतळावर पंतप्रधानांचे स्वागत करण्यासाठी भाजप नेत्यांनी जय्यत तयारी केली आहे. दरम्यान, भाजप नेत्यांनी पंतप्रधानांच्या ‘रोड शो’चे आयोजन करण्याची तयारी सुरू केली होती. मात्र, रोड शो होणार नसल्याचे केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे यांनी सांगितले आहे.









