लवकरच कार्यान्वित होण्याची शक्यता : प्रदूषण टाळण्यासाठी इलेक्ट्रिक बसची संकल्पना : प्रवाशांचा प्रवासही सुखकर होणार
बेळगाव : पीएम ई बससेवा योजनेंतर्गत राज्यातील 11 शहरांना इलेक्ट्रिक बसेस पुरविल्या जाणार आहेत. यामध्ये बेळगाव शहराचादेखील समावेश आहे. त्यामुळे लवकरच बेळगावात पीएम ई बससेवा योजनेची इलेक्ट्रिक बस धावणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा प्रवासही सुखकर होणार आहे. प्रदूषण टाळण्याबरोबरच आर्थिक बचत व्हावी, यासाठी इलेक्ट्रिक बसची संकल्पना पुढे येऊ लागली आहे. राज्यातील म्हैसूर, मंगळूर, दावणगेरी, शिमोगा, तुमकूर, हुबळी, धारवाड, गुलबर्गा, बळ्ळारी आणि विजापूर आदी जिल्ह्यांमध्ये बसेस धावणार आहेत. म्हैसूर आणि मंगळूर शहरासाठी 100, दावणगेरी, शिमोगा आणि तुमकूर जिल्ह्यासाठी प्रत्येकी 50, बेळगावसाठी 100, हुबळी आणि धारवाडसाठी 110, गुलबर्गा 100, बळ्ळारी 55 तर विजापूरसाठी 80 बसेस उपलब्ध केल्या जाणार आहेत. परिवहन मंडळाने यापूर्वी बेंगळूर आणि मंगळूर शहरात इलेक्ट्रिक बस सुरू केल्या आहेत.
या बसना प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्याचबरोबर आता पीएम ई बससेवा योजनेंतर्गत राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये इलेक्ट्रिक बस चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी केएसआरटीसीने जादा इलेक्ट्रिक बसेसची मागणी केली आहे. केंद्र सरकारच्या पीएम ई बससेवा योजनेंतर्गत देशातील 169 शहरांमध्ये 10 हजार इलेक्ट्रिक बस सोडण्याचा मानस आहे. यामध्ये बेळगाव शहराचा समावेश आहे. त्यामुळे पीएम ई बससेवा बेळगाव शहरामध्येही लवकरच धावताना दिसणार आहे. 2011 च्या जनगणनेवर आधारित ज्या शहराची संख्या 3 लाखापेक्षा अधिक आहे, अशा शहरांमध्ये ही बससेवा सुरू करण्याला प्राधान्य दिले जाणार आहे. इंधन बचत व्हावे आणि प्रदूषण टाळावे यासाठी इलेक्ट्रिक वाहनांना पसंती दिली जात आहे. मात्र चार्जिंग स्टेशनअभावी ही संकल्पना संथगतीने सुरू आहे. मात्र आता केंद्र सरकारने देशातील विविध शहरांमध्ये इलेक्ट्रिक बस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आकर्षक आणि सर्व सुविधांनीयुक्त आरामदायी इलेक्ट्रिक बसेस विविध शहरांमध्ये सेवा देणार आहेत.
100 बसेस उपलब्ध होण्याची शक्यता
पीएम ई बससेवा योजनेंतर्गत राज्यातील 11 शहरांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये बेळगावचा समावेश आहे. त्यामुळे बेळगाव आगाराला या योजनेंतर्गत बसेस दिल्या जाणार आहेत. बेळगावसाठी 100 बसेस उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
गणेश राठोड-विभागीय नियंत्रक, बेळगाव









