ऑनलाईन टीम / लखनऊ :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काळा झेंडा दाखवणाऱ्या काँग्रेस नेत्या रीता यादव यांच्यावर अज्ञातांनी गोळीबार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यादव यांच्या पायाला गोळी लागल्याने त्या जखमी झाल्या आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
यादव यांनी काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशमधील सुलतानपूर जिल्ह्यात मोदींना काळा झेंडा दाखवला होता. दरम्यान, सोमवारी पोस्टर आणि बॅनर बनवण्याच्या कामानिमित्त त्या सुलतानपूरमध्ये गेल्या होत्या. सायंकाळी काम संपवून घरी जात असताना त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. लंभुआ परिसरात हायवेवर 3 जणांनी त्यांच्या गाडीला ओव्हरटेक करुन समोर दुचाकी आडव्या उभ्या केल्या. या तिघांनी शिवीगाळ करत गाडीतील लोकांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांनी चालकाच्या डोक्यावर पिस्तूल ठेवले. त्यानंतर मी पिस्तूल लावणाऱ्याच्या कानशिलात लगावली. तेव्हा संतापलेल्या त्या व्यक्तीने माझ्यावर गोळी झाडली. ती गोळी माझ्या पायाला लागली आणि ते हल्लेखोर तेथून फरार झाले. असे रिता यांनी सांगितलं.









