केवळ दोन कि. मी. अंतराच्या रस्त्याच्या दुरुस्तीकडे कर्नाटक सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष
वार्ताहर/उचगाव
उचगाव-कोवाड मार्गावरील अतिवाड फाटा ते कर्नाटक-महाराष्ट्र हद्दीपर्यंतच्या दोन किलोमीटर अंतराच्या रस्त्याची अक्षरश: चाळण झाली असून, मोठमोठे खड्डे आणि वळणे यामुळे या दोन किलोमीटर अंतर पास करण्यासाठी वाहनधारकांना कसरत करावी लागते. तसेच वाहनांचेही या खराब रस्त्यामुळे नुकसान होत असल्याच्या तक्रारी वाढल्या असून पीडब्ल्यूडी खात्याने तातडीने याची दुऊस्ती करावी, अशी मागणी प्रवासीवर्गातून करण्यात येत आहे. उचगाव-कोवाड हा मार्ग दोन राज्यांना जोडणारा अतिशय महत्त्वाचा रस्ता आहे. उचगाव फाटा ते अतिवाड फाटा हा पाच किलोमीटर अंतराचा रस्ता शासनाने केला असून अवघ्या दोन किलोमीटर अंतराचा रस्ता करण्यात आलेला नाही.
सदर दोन किलोमीटर अंतराचा रस्ता हा डोंगराळ भागातून असल्याने डोंगरातून येणारा पाण्याचा मोठा लोंढा या रस्त्यावरून पास होत असतो. आणि त्यामुळे या रस्त्याची अक्षरश: दुर्दशा झाली आहे. या डोंगराळ भागातून सदर रस्ता शोधण्याची वेळ प्रवासी वर्गावर आली आहे. मोठमोठे खड्डे, दगड आणि खडी विखुरलेली असल्याने रात्रीच्या वेळी अनेक अपघात या भागात होत आहेत. तसेच या दोन किलोमीटर अंतराच्या रस्त्यावरती अनेक प्रकारची वळणेही असल्याने सदर वळणे पास करणे आणि खराब रस्ता यामुळे प्रवासी वर्गाच्या नाकीनऊ येत आहे. त्यासाठी तातडीने या रस्त्याचे डांबरीकरण अथवा सिमेंटीकरण करण्यात यावे, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे.
महाराष्ट्र हद्दीतील रस्ता दर्जेदार
कर्नाटक-महाराष्ट्र हद्दीपासून महाराष्ट्रात जाणारा पुढील कोवाडपर्यंतचा रस्ता अतिशय चांगला असून, अवघा दोन किलोमीटरचा कर्नाटक हद्दीतील रस्ता अत्यंत खराब झालेला आहे. तरी संबंधित खात्याने व लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन या रस्त्याची दुऊस्ती करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
खड्डे-धुळीने माखलेला रस्ता
उन्हाळ्यात धुळीने माखलेला तर पावसाळ्यात चिखल आणि पाण्याने भरलेले खड्डे यामुळे प्रवासी वर्गाला या सर्व गोष्टींशी सामना करत हा दोन किलोमीटर अंतराचा रस्ता पार करण्याची वेळ आली आहे. गेल्या दोन दिवसापूर्वी या भागात झालेल्या अवकाळी पावसामुळे सदर खड्ड्यांतून पाणी साचूनही प्रवासी वर्गाला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यासाठी शासनाने तातडीने या रस्त्याची दुऊस्ती करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.









