ग्राम पंचायतीचे दुर्लक्ष : त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी
वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
गौंडवाड गावच्या वैभवात भर घालणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून गावात प्रवेश करणाऱ्या रस्त्याची दुर्दशा झाली असून ग्रामस्थांना व पै पाहुण्यांना गावात प्रवेश करतानाच या खड्डेमय व चिखलमय रस्त्यातून प्रवेश करावा लागत आहे. ग्रा. पं. सदस्य व ग्रा. पं. अधिकाऱ्यांना सदर रस्त्याच्या डांबरीकरणाबद्दल अनेकवेळा कळवूनसुद्धा इकडे दुर्लक्षच होत असल्यामुळे नागरिकांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी व लोकप्रतिनिधीनी इकडे त्वरित लक्ष देऊन रस्त्याचे डांबरीकरण करून ग्रामस्थांना दिलासा देण्याची मागणी करण्यात येत आहे.
गौंडवाड गाव कंग्राळी बुद्रुक ग्रा. पं. कार्यक्षेत्रामध्ये येते. तर विधान परिषद कार्यक्षेत्र यमकनमर्डी मतदारक्षेत्रामध्ये येते. यामुळे या गावाला मोठा विकासनिधी मिळणे गरजेचे आहे. मागीलवर्षी मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या फंडातून यमनापूरपासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंतच्या मुख्य रस्त्याचे डांबरीकरण झाल्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. परंतु गावातील इतरही रस्त्यांचे असेच डांबरीकरण किंवा काँक्रिटीकरण करून नागरिकांना दिलासा देण्याची नागरिकांतून मागणी होत आहे.
या संदर्भात ग्रा. पं. अध्यक्षा रोहिणी नाथबुवा यांना विचारले असता त्या म्हणाल्या, शिवपुतळ्यापासून होळी चौकपर्यंतच्या रस्त्यासाठी 10 लाख रुपये, होळी चौक ते शेताकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी 25 लाख रुपये तसेच शिवाजी गल्लीतील रस्त्यासाठी 10 लाख रुपये असे एकूण 45 लाख रुपये रस्ता काँक्रिटीकरणासाठी मंजूर झाले आहेत. तसेच ही कामे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या फंडातूनच मंजूर झाली आहेत. आता पावसाळा संपल्यानंतर वरील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात येणार असल्याचे त्यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले.









