खानापूर तालुक्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान : आमदार विठ्ठल हलगेकर यांनी समस्येकडे लक्ष घालण्याची मागणी
खानापूर : खानापूर बस आगाराचे व्यवस्थापन काही सुधरायचे नाव घेत नाही. त्यामुळे तालुक्यातील विद्यार्थ्यांची फरफट सुरुच आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना वेळेवर पोहोचण्यासाठी धडपड करावी लागत आहे. यासाठी बसमधून लेंबकळत जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. नूतन आमदार विठ्ठल हलगेकर यांनी याबाबत खानापूर आगाराला सूचना केल्या होत्या. तसेच बेळगाव जिल्हा नियंत्रकांना भेटून जादा बससेवा सुरू करण्यासंदर्भात लेखी निवेदन दिले होते. मात्र याचा कांहीही परिणाम झालेला नाही. त्यामुळे खानापूरची बससेवा बेभरवशाचीच झाली आहे. त्यामुळे विद्यार्थी व प्रवाशांची फरफट काही थांबेना. आमदार विठ्ठल हलगेकर यांनी याबाबत कठोर भूमिका घेऊन परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांना बससेवा सुरळीत करण्यासंदर्भात समज देणे गरजेचे आहे. खानापूर तालुक्यातून बेळगाव येथे नोकरी, व्यवसायानिमित्त तसेच महाविद्यालयीन शिक्षणासाठी हजारो विद्यार्थी व प्रवासी बेळगावला जातात. नवे शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी आपल्या शिक्षणासाठी सकाळी 7 ते 11 या वेळेत बेळगावला जातात. विद्यार्थ्यांना वेळेवर महाविद्यालयात पोहोचणे गरजेचे असते. मात्र त्यांच्या वेळेत खानापूरहून बेळगावसाठी बससेवा सुरळीत नसल्याने विद्यार्थ्यांना वेळेवर महाविद्यालयात पोहचता येत नाही. तसेच सायंकाळी 3 ते 6 या वेळेत खानापूरला परत येण्यासाठी बसेस नसल्याने विद्यार्थ्यांना दोन-दोन तास ताटकळत उभे रहावे लागत आहे. सकाळी 7 वाजता बेळगावला गेलेल्या विद्यार्थ्यांना आपले शिक्षण घेऊन बससाठी पुन्हा दोन-दोन तास ताटकळत थांबावे लागल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक तसेच शारीरिक नुकसान होत आहे. बेळगावहून खानापूरला येण्यासाठी तसेच खानापूरहून बेळगावला जाण्यासाठी बससेवा वेळेत नसल्याने विद्यार्थ्यांची मिळेल त्या बसमधून पोहचण्यासाठी धडपड सुरू असते. या धडपडीत अनेकवेळा अपघातही घडले आहेत.
वस्ती बस सुरू होणे आवश्यक
खानापूर तालुक्यात कुंभार्डा, गोदगेरी, मेरडा, कापोली, हलसाल, हलशी, नंदगड, बिडी या ठिकाणी अनेक वर्षापासून वस्ती बस होत्या. या वस्ती बस गेल्या काही वर्षापासून बंद केल्याने तसेच गोदगेरी, हलसाल, कापोली, कुंभार्डा या बस खानापूरपर्यंत असल्याने बेळगावला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची खानापुरात गर्दी होत आहे. यापूर्वी ज्या गावांच्या वस्ती बससेवा होत्या. त्या पुन्हा सुरू केल्यास विद्यार्थ्यांना बेळगाव येथे शिक्षणासाठी वेळेवर पोहचता येणे शक्य आहे. यासाठी गोदगेरी-बेळगाव, मेरडा-बेळगाव, हलसाल-बेळगाव, हलशी-बेळगाव, नंदगड-बेळगाव, कुंभार्डा-बेळगाव अशा बस सुरू करणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच कक्केरी-लिंगनमठ या ठिकाणी वस्ती बस सुरू करावी, अशी मागणी होत आहे.
सकाळच्या वेळेत बससेवा आवश्यक
खानापूर येथून सकाळी 6.30 पासून 10 पर्यंत या बससेवा सुरू झाल्यास विद्यार्थी तसेच बेळगाव येथे नोकरी व्यवसायानिमित्त जाणाऱ्या प्रवाशांची योग्य सोय होणार आहे. तसेच बेळगावहून दुपारी 3 ते 6 या वेळेत सुरळीत बससेवा केल्यास तसेच स्टेशन, पहिले गेट, दुसरे गेट तसेच तिसरे गेट या ठिकाणी बस थांबवून विद्यार्थ्यांना बसमध्ये घेणे बंधनकारक करण्यात यावे.
आठ दिवसात बससेवा सुरळीत न झाल्यास रास्ता रोकोचा इशारा
नंदगड व खानापूर येथून येत्या आठ दिवसात बससेवा सुरळीत झाली नसल्यास नंदगड येथील जि. पं. माजी सदस्य पुंडलिक कारलगेकर व कसबा नंगड ग्रा. पं. सदस्य प्रवीण पाटील यांनी रास्ता रोको करण्याचा इशारा दिला आहे. याची दखल परिवहन मंडळाने तसेच तालुक्याचे आमदार विठ्ठल हलगेकर यांनी घ्यावी, असे मत व्यक्त करण्यात येत आहे.
परिवहन अधिकाऱ्यांची मनमानी
विद्यार्थ्यांनी अनेकवेळा मागणी करूनदेखील बससेवा सुरळीत करण्यात आली नाही. आमदार विठ्ठल हलगेकर यांनी याबाबत विद्यार्थ्यांची, पालकांची आणि खानापूर बस नियंत्रकांची बैठक घेणे गरजेचे आहे. अन्यथा गेल्या अनेक वर्षापासून विद्यार्थ्यांची होणारी फरफट यापुढेही सुरुच राहणार आहे. परिवहन मंडळाचे अधिकारी बेजबाबदारपणे वागत आहेत. तसेच आपल्या मनमानी कारभारामुळे अनेकवेळा वादाचे मारामारीचे प्रसंग घडलेले आहेत.









