प्रवाशांची गैरसोय, मनपाचे दुर्लक्ष
बेळगाव : स्मार्टसिटी अंतर्गत शहरात उभारण्यात आलेल्या स्मार्ट बसस्थानकातील आसनांची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ लागली आहे. विशेषत: वयोवृद्ध आणि लहान बालकांची हेळसांड होऊ लागली आहे. बसस्थानकातील खुर्च्या मोडून पडल्याने प्रवाशांनी बसावे कुठे? असा प्रश्नही उपस्थित होऊ लागला आहे. याकडे आता स्थानिक प्रशासन लक्ष देणार का? असा संतप्त सवाल विचारला जात आहे. शहरात स्मार्ट बसथांबे उभारण्यात आले आहेत. मात्र, स्मार्ट बसथांब्यातील खुर्च्या आणि इतर साहित्याची दुर्दशा झाली आहे. उन्हाची तीव्रता वाढल्याने प्रवासी आसरा घेण्यासाठी बसथांब्यात जाऊ लागले आहेत. मात्र, बसथांब्यात आसनांची दुर्दशा झाल्याने प्रवाशांना ताटकळत थांबावे लागत आहे. त्यामुळे स्मार्ट बसस्थानकात तोडकीमोडकी आसने असे चित्र पहावयास मिळत आहे. या बसस्थानकातील आसनांच्या व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मात्र गैरसोय होऊ लागली आहे. वडगाव भागात असलेल्या स्मार्ट बसथांब्यावरील पत्रे तुटले आहेत. शिवाय इतर ठिकाणी असलेल्या बसस्थानकात आसने तुटून दुर्दशा झाली आहे. त्यामुळे प्रवासी उभे राहण्यातच धन्यता मानू लागले आहेत. शहरात मंत्री येताच केवळ तात्पुरती डागडुजी केली जाते. मात्र, प्रत्यक्षात शहरातील बसथांब्यांच्या दुर्दशेचे चित्र पहावयास मिळते.









