आगारात चौकशी केली असता केंद्रातून अजब उत्तरे : रुग्णांचे हाल
परळी : वाहक आजारी आहे, चालक नाही, एसटी बस डिझेल भरायला गेली आहे, पंढरपुर यात्रेमुळे गाडय़ा उपलब्ध नाहीत तर कधी गाडी ना दुरुस्त अशा अनेक कारणांनी परळी खोऱयातील बस सेवा अचानक रद्द केली जात आहेत. त्यामुळे कित्येक तास प्रवाशांना ताटकळत बसावे लागत आहे. प्रवाशांनी आगारात वारंवार फोन केल्या नंतरच फोन उचलला जातो. फोन उचलल्यावर जे उत्तर मिळते ते एकून प्रवाशांनाच पुढे काय बोलावे हेच सूचत नाही. त्यामुळे प्रवाशांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
ग्रामीण व दुर्गम भाग म्हणून परळी खोऱ्याकडे पाहिले जाते. येथील ग्रामस्थांना दळणवळणासाठी एसटी हेच एक मुख्य साधन आहे. मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी तर पंढरपुर यात्रेवेळी फेऱ्या कमी व रद्द होण्याचे प्रमाण जात होते. अलीकडे तर अचानकच कोणत्याही कारणाने बस फेरी रद्द केली जात असल्याने वयोवृध्दांपासून ते अगदी विद्यार्थ्यांनाही तासनतास एसटीची वाट बघावी लागत आहे. याबाबत आगारात चौकशी केंद्रावर फोन करावा तर तो कधी लागतो तर कधी उचलला जात नाही तर कधी अजब कारणे सांगून वेळ मारली जाते यामुळे प्रवाशांना नाहक त्रास होत आहे.
रुग्णांचे हाल
पावसाळ्य़ाचे दिवस तसेच भात लावण सुरु असल्याने तासनतास पाण्यात काम करुन आजारी होण्याचे प्रमाण वाढले असताना परळी सातारा येथील दवाखान्यात रुग्णांना घेऊन जायचे तर अचानकच एसटी फेरी रद्द होते. तर दवाखान्यातून घरी जात असताना एसटीकडे डोळे लावून बसावे लागत आहे. त्यामुळे बससेवा सुरळीत करावी अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.









