रस्त्याच्या विकासासाठी निधीचा अभाव : निधी मंजूर करून रस्ता त्वरित दुरुस्त करण्याची मागणी
वार्ताहर/जांबोटी
जांबोटी-चापोली या मुख्य रस्त्यापासून चिरेखानी फाटा ते चिरेखानी वाड्यापर्यंतच्या संपर्क रस्त्याचे काम गेल्या दोन वर्षापासून अर्धवट अवस्थेत असून रस्त्याची पार दुर्दशा झाली आहे. रस्त्याअभावी येथील नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. रस्त्यासाठी निधी मंजूर करावा, अशी मागणी होत आहे. जांबोटी ग्राम पंचायत कार्यक्षेत्रातील दुर्गम भागात व भीमगड अभयारण्यात वसलेल्या चिरेखानी हणबरवाडा येथे साधारण वीस ते पंचवीस कुटुंबे वास्तव्यास आहेत. मात्र वाड्याच्या विकासाकडे संबंधित ग्राम पंचायत व शासनाचे दुर्लक्ष झाल्यामुळे येथील नागरिकांना अनेक गंभीर समस्यांचा सामना करावा लागत आहे.
रस्त्याअभावी अनेकांना हालअपेष्टांचा सामना करावा लागत आहे. जांबोटी-चापोली मुख्य रस्त्यापासून चिरेखानी गावापर्यंतचे अंतर साधारण तीन किलोमीटर आहे. दोन वर्षांपूर्वी आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या प्रयत्नातून या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर करण्यात आला होता. या अंतर्गत चिरेखानी अॅप्रोच रस्त्याच्या दीड कि. मी. रस्त्याचे डांबरीकरण केल्यामुळे या दुर्गम गावातील नागरिकांची बऱ्यापैकी गैरसोय दूर झाली आहे. मात्र उर्वरित रस्त्याचे काम वर्षंभरापासून अद्याप अर्धवट असल्याने सध्या या भागात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे या रस्त्याची पार दुर्दशा झाली आहे.
चिखलाचे साम्राज्य,वाहन चालविणे कठीण
रस्त्यावर सर्वत्र मोठ्या प्रमाणात चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. रस्त्यावर गटारीसदृश्य चरी पडल्यामुळे रस्त्यावरून साधी दुचाकी चालविणेही नागरिकांना दुरापास्त बनले आहे. वाड्यावर केवळ उन्हाळ्dयाच्या दिवसात दुचाकी वाहन जाऊ शकते. मात्र पावसाळ्dयात रस्त्याअभावी गावांमध्ये कोणतेच वाहन जाऊ शकत नसल्यामुळे नागरिकांना घनदाट जंगलातून दोन किलोमीटर अंतर मुख्य रस्त्यापर्यंत पायपीट करावी लागते. गावातील कोणा व्यक्तीवर हिंस्र प्राण्यांचा हल्ला होऊन जखमी झाल्यास अथवा गावातील कोणी आजारी पडल्यास रस्त्याअभावी येथील नागरिक चादरीचा पाळणा करून त्याला मुख्य रस्त्यावर नेऊन त्यानंतरच त्याला वाहनातून दवाखान्यापर्यंत पोहोचवावे लागते.
आमदारांनी लक्ष घालण्याची मागणी
या रस्त्याची समस्या सोडवावी, या मागणीसाठी ग्राम पंचायत ते जिल्हा पंचायतीपर्यंत सर्वच लोकप्रतिनिधींना निवेदने देण्यात आली आहेत. मात्र अद्याप अर्धवट अवस्थेत राहिलेल्या रस्त्यासाठी निधी मंजूर नसल्यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. तरी आमदार विठ्ठल हलगेकर व जांबोटी ग्रा.पं. पदाधिकाऱ्यांनी लक्ष घालून रस्त्याच्या कामासाठी निधी उपलब्ध करून होणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणी ग्राम पंचायत सदस्या अंजना हणबर यांनी केली आहे.









