शाळेची भिंत कोसळली, वर्गखोल्यांना तडे : विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न, गटशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : मागील आठवड्याभरापासून सुरू झालेल्या जोरदार पावसाने बेकिनकेरे येथील प्राथमिक मराठी शाळेच्या वर्गखोल्यांची दुर्दशा झाली आहे. काही वर्गखोल्या जीर्ण होऊन काही भाग कोसळला आहे. तर भिंतींनाही तडे जाऊन गळती सुरू झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत एसडीएमसी अध्यक्ष व सदस्यांनी मंगळवारी ग्रामीण गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले. शिवाय येत्या काळात शाळेची दुरुस्ती न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. एकूण 12 वर्गखोल्या आहेत. मात्र त्यापैकी चार वर्गखोल्या जीर्ण होऊन वापराविना पडून आहेत. त्यामुळे आठ वर्गखोल्यांमध्ये शैक्षणिक अध्यापन सुरू आहे. मात्र सध्या सुरू असलेल्या पावसामुळे काही वर्गखोल्यांमध्ये गळती सुरू झाली आहे. त्यामुळे पहिली आणि दुसरीचा वर्ग एकत्रित भरविण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ लागले आहे. याबाबत ग्राम पंचायत आणि शिक्षणखात्याकडे तक्रार करण्यात आली आहे. मात्र याकडे साफ दुर्लक्ष झाल्याने वर्गखोल्यांची दुरवस्था झाली आहे. वर्गखोल्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्याने विद्यार्थ्यांना गळक्या आणि मोडक्या शाळेतच शिक्षण घ्यावे लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
विद्यार्थ्यांना धोका, त्वरित शाळा दुरुस्तीची मागणी
सतत पावसामुळे भिंतीना तडे गेले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना धोका स्वीकारुन शिक्षणाचे धडे गिरवावे लागत आहेत. जीर्ण झालेल्या वर्गखोल्या आणि तडे गेल्यामुळे भितीच्या छायेखालीच शाळा भरू लागली आहे. त्यामुळे शाळेची तातडीने दुरुस्ती करून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी निवेदन देऊन करण्यात आली आहे. यावेळी एसडीएमसी अध्यक्ष प्रभाकर फडके, वासुदेव यळ्ळूरकर, परशराम सावंत, सोमनाथ भडांगे, संभाजी भोगण यासह शिक्षक उपस्थित होते.
शिक्षकांची कमतरता
शाळेची पटसंख्या 238 असली तरी सध्या शाळेत तीनच शिक्षक कार्यरत आहेत. एकूण 5 शिक्षक आहेत. मात्र त्यापैकी दोन शिक्षक अधिक काळासाठी रजेवर गेले आहेत. त्यामुळे तीन शिक्षकांवर शाळेचा कारभार सुरू आहे. एका शिक्षकाला दोन तीन वर्ग सांभाळण्याची जबाबदारी आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ लागले आहे. त्यामुळे शिक्षण खाते शाळेकडे लक्ष देणार का? असा प्रश्नही ग्रामस्थ आणि शिक्षणप्रेमींतून उपस्थित होऊ लागला आहे.









