शहापूर महामंडळाची पालकमंत्र्यांकडे मागणी
बेळगाव : बेळगावात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. केवळ शहरात 370 हून अधिक गणेशोत्सव मंडळे आहेत. वर्षातील केवळ 11 दिवस हा सण साजरा करण्यात येतो. त्यामुळे गणेश मंडळांचे विद्युतबिल माफ करावे, अशी मागणी शहापूर मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळातर्फे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांची भेट घेऊन विविध समस्यांबाबत चर्चा केली. हिंदू धर्मियांचा महत्त्वाचा सण म्हणून गणेशोत्सवाकडे पाहिले जाते. मुंबई, पुण्यानंतर मोठा गणेशोत्सव बेळगावमध्ये पाहायला मिळतो. या धार्मिक उत्सवाला सामाजिक रूप देण्यात येते. त्यामुळे आसपासचे लाखो भाविक देखावे पाहण्यासाठी येतात. त्यामुळे गणेश मंडळांचे बिल माफ करण्याची मागणी केली आली. पालकमंत्र्यांनी निवेदन स्वीकारून आपण विचार करू, असे आश्वासन दिले. यावेळी महामंडळाचे अध्यक्ष नेताजी जाधव, कार्याध्यक्ष रमेश सोनटक्की, उपाध्यक्ष अशोक चिंडक, सेक्रेटरी राजू सुतार, दिनेश मेलगे, माजी उपमहापौर संजय शिंदे यांच्यासह सदस्य उपस्थित होते.









