सीमा सुरक्षा दलाचा सैनिक अद्यापही पाकिस्तानात
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पाकिस्तानच्या क्षेत्रात चुकून गेलेला आणि पाकिस्तानी सैन्याने ताब्यात घेतलेला सीमा सुरक्षा दलाचा सैनिक अद्यापही पाकिस्तानच्याच ताब्यात आहे. सरकारने त्याच्या सुटकेसाठी हस्तक्षेप करावा आणि माझ्या पतीची सुखरुप सुटका करुन त्याला भारतात परत आणावे, अशी मागणी त्याच्या पत्नीने केली आहे.
पूर्णम कुमार शॉ असे या सैनिकाचे नाव आहे. तो गुरुवारी गस्त घालत असताना वाट चुकल्याने पाकिस्तानच्या क्षेत्रात गेला होता. पाकिस्तानी रेंजर्सनी त्याला ताब्यात घेतले आहे. त्यासंबंधी पाकिस्तानी रेंजर्सच्या अधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली जात आहे. तथापि, अद्याप त्याची सुटका करण्यात आलेली नाही. त्याला त्वरित भारताला परत द्यावे, अशी मागणी भारताने रेंजर्सकडे केली आहे.
होत आहेत प्रयत्न
शॉ याला परत आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोन्ही संस्थांकडून पाकिस्तानच्या संबंधित विभागाशी संपर्क करण्यात आला असून त्याची सुटका करण्याची मागणी करण्यात आली आहे. सध्या पेहलगाम हल्ल्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध तणावपूर्ण बनले आहेत. परिणामी, शॉ यांची सुटका करण्यात अडथळे येत आहेत. मात्र, ते सुरक्षित आहेत. त्यांना अपाय झालेला नाही, अशी माहिती सीमा सुरक्षा दलाच्या कार्यालयाकडून देण्यात आली.
अपहरण झाल्याचा आरोप
आपले पती वाट चुकून पाकिस्तानी क्षेत्रात गेलेले नसून पाकिस्तानी रेंजर्सनी त्यांचे अपहरण केले आहे. आपल्या पतीच्या मित्राने ही माहिती आपल्याला दूरध्वनीवरुन दिली आहे, असा आरोप शॉ यांच्या पत्नी रजनी शॉ यांनी केला आहे. शॉ हे सीमेवर गस्त घालत असताना त्यांचे अपहरण करण्यात आले आहे. ते सेवेवर होते. मात्र, त्यांची प्रकृती स्वस्थ नव्हती. त्यामुळे गस्त घालत असताना ते एका झाडाखाली विश्रांतीसाठी बसले. तेथे त्यांना झोप लागली. ते झोपेत असतानाच पाकिस्तानी रेंजर्सनी त्यांना पकडून त्यांचे अपहरण केले, असे रजनी शॉ यांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांचे अपहरण झाले, की ते स्वत: चुकून पाकिस्तानी क्षेत्रात गेले, यासंबंधात अस्पष्टता आहे. मात्र, लवकरच त्यांची सुटका होईल, अशी भारताची अपेक्षा असून त्यादृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहेत.









