ग्राम वन केंद्र चालकांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : राज्य सरकारने महिलांसाठी सुरू केलेल्या गृहलक्ष्मी योजनेचा अर्ज भरण्यासाठी ग्राम वन, सेवाकेंद्रातून सोय करण्यात आली आहे. यासाठी सरकारकडून प्रत्येक अर्जाला 20 रुपये शुल्क देण्यात येत आहे. सदर शुल्क 50 रुपयांप्रमाणे देण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन ग्राम वन केंद्राच्या चालकांकडून जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. राज्य सरकारने जारी केलेल्या गृहलक्ष्मी योजनेसाठी विविध ठिकाणी अर्ज भरण्याची सोय केली आहे. यासाठी गावागावात असणाऱ्या ग्राम वन सेवाकेंद्रातूनही सोय केली आहे. लाभार्थ्यांकडून कोणतेच शुल्क घेतले जात नाही. यासाठी सरकारने शुल्क भरण्याची जबाबदारी घेतली आहे. प्रत्येक अर्जाला 20 रुपये शुल्क देण्यात येत आहे. यामध्ये जीएसटी व इतर खर्च कपात करून केवळ 10 रुपये उरत आहे. त्यामुळे ग्राम वन केंद्र चालकांना हे शुल्क न परवडणारे ठरत आहे. केंद्राचे भाडे, पेपर खर्च, वीज बिल, इंटरनेट खर्च भरावा लागतो. त्यामुळे सरकारकडून देण्यात येणारे शुल्क अत्यल्प आहे. हे शुल्क प्रत्येक अर्जाला 50 रुपये प्रमाणे वाढवून देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
सर्व्हर डाऊनची समस्या कायम
सध्या सर्वत्र अर्ज भरणा सुरू असल्याने सर्व्हर डाऊनची समस्या सुरू आहे. त्यामुळे दिवस भरात 30 अर्ज भरले जात आहेत. सरकारकडून 60 अर्ज भरण्याची अट घातली आहे. त्यामुळे देण्यात आलेले शुल्क व सर्व्हर डाऊनची समस्या हे ग्राम वन चालकांना न परवडणारे ठरत आहे. शासनाने यावर त्वरित विचार करून निर्णय घ्यावा, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी विविध गावातील ग्राम वन केंद्राचे चालक उपस्थित होते.









