हेस्कॉमकडून थ्री फेज वीजपुरवठा रात्रीच्या वेळी : तोही अपुराच : दिवसा वीजपुरवठा करण्याची मागणी
वार्ताहर /किणये
गेल्या दीड महिन्यापासून तालुक्यात पावसाने हुलकावणी दिली आहे. पावसाअभावी पिके सुकून गेली आहेत. बेळगाव तालुका दुष्काळग्रस्त बनला आहे. शेतशिवारातील पिकांना शेतकरी शिवारातील विहिरी व कूपनलिकेचे पाणी देऊ लागले आहेत. मात्र बिजगर्णी-बेळगुंदी, कावळेवाडी-बेळवट्टी भागात रात्रीच्या वेळी थ्री फेज वीजपुरवठा देऊन शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळ करण्यात येत आहे. रात्रीच्यावेळी वीजपुरवठा दिला जात असून तोही सुरळीत केला जात नाही, अशा तक्रारी या भागातील शेतकऱ्यांतून होत आहेत. पावसाअभावी शेतातील पिके सुकून गेलेली आहेत. हे पाहून शेतकऱ्यांचा जीव कासावीस होऊ लागला आहे. पिकांना पाणी देण्यासाठी बळीराजा धडपडताना दिसतो आहे. मात्र नदी, नाल्यांच्या पाणीपातळीतही घट झाली आहे. त्यामुळे आता शेतकरी केवळ शिवारातील विहिरी व कूपनलिकेच्या पाण्यावर अवलंबून आहेत. या कूपनलिकेचे व विहिरीचे पाणी देण्यासाठी त्यांना रात्रीच्यावेळी शिवारात यावे लागते. कारण कावळेवाडी-बेळवट्टी भागात थ्री फेज वीजपुरवठा रात्रीच्यावेळी देण्यात येऊ लागला आहे.
रात्रीच्यावेळी थ्री फेज वीजपुरवठा खंडित होऊ लागला आहे. त्यामुळे रात्री घरातून शिवारात जाऊन पिकांना पाणी न देताच शेतकऱ्यांना माघारी परतावे लागत आहे. रात्री 11 ते पहाटे 4 पर्यंत वीजपुरवठा सध्या या भागात देण्यात येऊ लागला आहे. या पाच तासाच्या कालावधीमध्ये 4 ते 5 वेळा थ्री फेज वीजपुरवठा खंडित केला जात आहे, अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली. कावळेवाडी, बिजगर्णी, बेळवट्टी, इनामबडस, बेळगुंदी, बाकनूर, राकसकोप, यळेबैल, सोनोली, बोकनूर या भागात अपुरा व अनियमित थ्री फेज वीजपुरवठा केला जात आहे. यामुळे हेस्कॉमच्या या गलथान कारभाराला शेतकरी वर्ग वैतागून गेला आसून नाराजी तसेच संताप व्यक्त करण्यात येत आहे.
रात्रीच्या वेळी थ्री फेज वीजपुरवठ्यामध्येही सातत्य नाही
रात्रीच्या वेळी थ्री फेज वीजपुरवठा दिला जात आहे. मात्र या वीजपुरवठ्यामध्येही सातत्य नाही. वीज जोडली जाते आणि वारंवार बंद करण्यात येते. यामुळे शेतात गेलेल्या शेतकऱ्यांना पिकाला पाणी द्यायचे कसे? असा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांचे या भागाकडे साफ दुर्लक्ष झाले आहे. रात्रीच्यावेळी वीजपुरवठा न देता दिवसा थ्री फेज सुरळीत वीजपुरवठा द्यावा, अशी आमची मागणी आहे. हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांनी या भागातील शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेऊन योग्य तो तोडगा काढावा, अन्यथा आम्ही हेस्कॉमच्या विभागीय कार्यालयावर धडक मोर्चा काढणार आहोत.
– अॅड. नामदेव मोरे, ग्रा. पं. सदस्य कावळेवाडी
रात्रीच्यावेळी शिवारात जाऊन पाणी देणे शेतकऱ्यांसाठी धोकादायक
बेळगुंदी भागातील थ्री फेज विद्युतपुरवठ्याचा खेळखंडोबा सुरू झाला आहे. यामुळे बळीराजा हतबल झाला आहे. आमच्या भागात रात्री 11 ते 4 पर्यंत थ्री फेज वीजपुरवठा देण्यात येतो. तर काही वेळेला दिवसा थ्री फेज वीजपुरवठा देण्यात येत होता. मात्र हा वीजपुरवठा सुरू असतानाच बंद केला जातो. यामुळे पिकांना पाणी देणे अवघड झाले आहे. रात्रीच्यावेळी शिवारात जाऊन पाणी देणे शेतकऱ्यांसाठी धोकादायक असे आहे. त्यामुळे बळीराजाच्या सुरक्षेचा विचार करून शेतकऱ्यांना दिवसा सुरळीत वीजपुरवठा द्यावा.
– गणपत बेळगावकर, शेतकरी- बेळगुंदी









