वृत्तसंस्था/ लंडन
इंग्लंडचे माजी महान फलंदाज ग्रॅहम गूच यांना वाटते की, भारत आणि इंग्लंडमधील पाच सामन्यांची मालिका ही दबावाखाली असलेल्या कसोटी स्वरूपासाठी गरजेची असलेली प्रेरणा देऊन गेली आहे, परंतु केवळ बड्या तीन संघांनी एकमेकांशी अधिकाधिक खेळण्याची सध्याची प्रवृत्ती अखेर कंटाळवाणी ठरेल आणि स्थिरता निर्माण करेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.
बहुतेक कसोटी क्रिकेट भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातच लढले जाते. ते पाच सामन्यांच्या मालिकेत एकमेकांशी खेळतात. वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडसह आर्थिकदृष्ट्या कमकुवत देश फक्त दोन किंवा तीन सामन्यांच्या मालिकेत भाग घेतात, याकडे त्यांनी लक्ष वेधले. पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्याच्या वेळी बोलताना इंग्लंडचे माजी कर्णधार म्हणाले की, कसोटी क्रिकेट बड्या तीन संघांच्या पलीकडे वाढायला हवे. ‘आयसीसी’ने कसोटी क्रिकेटकडे पाहण्याची आणि त्यातही आर्थिकदृष्ट्या कमी संपन्न देशांना ते कसे पाठिंबा देऊ शकतात हे पाहण्याची गरज आहे. मी त्यांना लहान देश म्हणणार नाही, तर आर्थिकदृष्ट्या कमी समृद्ध असे म्हणेन, असे गूच यांनी सांगितले.
कसोटी क्रिकेट जपायचे असेल, तर केवळ तीन संघांनी ते खेळून चालणार नाही. जर न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका यासारखे इतर संघ कमी-कमी कसोटी क्रिकेट खेळत राहिले, तर कोणाविऊद्धही खेळण्यासाठी कोणीही राहणार नाही. म्हणून एकंदरित खेळाला पाठिंबा द्यावा लागेल, असे 72 वर्षीय गूच म्हणाले. ते 8900 कसोटी धावांसह इंग्लंडचे तिसरे सर्वाधिक धावा काढणारे फलंदाज आहेत.
पाच सामन्यांमध्ये भारत आणि इंग्लंड यांचा कस लागल्याने आणि चुरशीचे सामने झाल्याने गूच खूष आहेत. ही एक अद्भूत मालिका आहे आणि कसोटी क्रिकेटसाठी खरोखरच चांगली आहे. कारण आम्हाला माहीत आहे की, फ्रँचायझी क्रिकेट जगभरात पसरले आहे आणि कसोटी क्रिकेटवर दबाव आहे. म्हणून अशा खूप डावपेच, भरपूर दर्जेदार क्रिकेट, बऱ्याच मोठ्या धावसंख्या, उत्तम गोलंदाजी सत्रे आणि तणावाच्या मालिका आवश्यक आहेत. दोन्ही संघांकडून खूप उत्साह दिसून आला, असे गूच पुढे म्हणाले.
भारतीय संघ चांगल्या हातांत
रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर संघात अनुभवाचा अभाव असला, तरी भारताकडून नेहमीच तीव्र झुंज दिली जाईल, अशी अपेक्षा होती. एक दार बंद होते तेव्हा दुसरे उघडते. महान खेळाडू किंवा कोणताही खेळाडू कायमचा खेळेल अशी अपेक्षा तुम्ही करू शकत नाही. एक वेळ अशी येते की, जेव्हा ते पुरे झाले असे ठरवतात किंवा निवृत्ती घेतात. वरील दोन खेळाडू भारताचे आणि महान खेळाचे अद्भूत सेवक राहिलेले आहेत. पण आता इतरांनीही यात सहभागी होण्याची वेळ आली आहे, असे प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये जवळपास 45,000 धावा केलेले गूच म्हणाले. मला वाटते की तऊण भारतीय खेळाडूंनी उत्तम कामगिरी केली आहे. कर्णधार शुभमन गिल उत्कृष्ट आहे. तो खरोखरच एक उत्तम दर्जाचा खेळाडू दिसतो आणि आशा आहे की, तो भविष्यात अनेक कसोटी धावा करेल आणि भारतासाठी अनेक विजय मिळवेल. म्हणून मला वाटते की, संघ चांगल्या हातात आहे, असे ते पुढे म्हणाले.









