भारतात सध्या इंडियन प्रीमियर लीगचा हंगामाला जोरदार सुरुवात झाली आहे. आतापर्यंत 19 सामने खेळले गेले आहेत. आयपीएलमध्ये तगड्या समजल्या जाणाऱ्या चेन्नई, हैदराबाद, मुंबईला समाधानकारक कामगिरी करता आलेली नाही. तर दिल्ली कॅपिटल्स, गुजरात टायटन्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर हे संघ गुणतालिकेत टॉप-4 मध्ये आहेत. अशातच आयपीएल भारताचे 4 धाडसी खेळाडू आतापर्यंत फ्लॉप ठरले आहेत. गेल्या आयपीएल हंगामात या खेळाडूंनी त्यांच्या शानदार कामगिरीने कहर केला होता, पण यंदाच्या हंगामात त्यांचा धावांसाठी संघर्ष सुरु असल्याचे आपण पाहत आहोत, अशाच स्टार पण आयपीएलमध्ये आतापर्यंत फ्लॉप ठरलेल्या खेळाडूंचा घेतलेला आढावा..
- ऋषभ पंत : यंदाच्या हंगामात ऋषभ पंत लखनौ सुपर जायंट्सचे नेतृत्व करत आहे. चालू हंगामात लखनौची कामगिरी काही खास राहिलेली नाही आणि हा संघ पॉइंट टेबलमध्ये सहाव्या क्रमांकावर आहे. दरम्यान, ऋषभ पंतने आतापर्यंत 4 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 4.75 च्या खराब सरासरीने फक्त 19 धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे, सर्वोच्च धावसंख्या 15 धावा आहे. गत हंगामाबद्दल बोलायचे झाले तर पंतने 13 सामन्यांमध्ये 446 धावा केल्या होत्या.
- अभिषेक शर्मा : सनरायझर्स हैदराबादचा सलामीवीर अभिषेक शर्माची आतापर्यंतची कामगिरी फारशी चांगली झालेली नाही. अभिषेक शर्माने आयपीएल आतापर्यंत 5 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 10.20 च्या खराब सरासरीने फक्त 51 धावा केल्या आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या 24 आहे. 2024 च्या हंगामात त्याने 484 धावा केल्या होत्या. आतापर्यंत झालेल्या सामन्यात त्याची बॅट शांत राहिली आहे, उर्वरित सामन्यात त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.
- रियान पराग : राजस्थानचा युवा क्रिकेटपटू रियान परागने यंदाच्या स्पर्धेत आतापर्यंत 4 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने फक्त 109 धावा केल्या आहेत. आयपीएल 2025 मध्ये परागने अद्याप बॅटने एकही अर्धशतक झळकावले नाही. उर्वरित सामन्यात मात्र राजस्थानला त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. आयपीएल 2024 च्या हंगामात, परागने 16 सामन्यांमध्ये 52.00 च्या सरासरीने 573 धावा केल्या होत्या.
- ऋतुराज गायकवाड : चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने आयपीएलमध्ये आतापर्यंत 4 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने फक्त 121 धावा केल्या आहेत. ऋतुराज या हंगामात चेन्नईसाठी नंबर 3 ची भूमिका सांभाळत आहे, जिथे तो सातत्याने चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरला आहे. त्याच वेळी, आयपीएल 2024 च्या हंगामात, ऋतुराज गायकवाडने 14 सामन्यांमध्ये 53.00 च्या सरासरीने 583 धावा केल्या. ऋतुराजच्या कामगिरीवर शंका नसली तरी त्याची बॅट आतापर्यंत शांत राहिलेली आहे. यामुळे पुढील सामन्यात तो कशी कामगिरी करतो, हे पाहणे महत्वाचे ठरेल.









