कोल्हापूर / अहिल्या परकाळे :
शिवाजी विद्यापीठ अंतर्गत बहुतांश खेळाडूंची निवड संलग्नित महाविद्यालयामधून केली जाते. त्यांना येण्याजाण्यापासून ते निवास – भोजनापर्यंत अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. विद्यापीठ प्रशासन निवासाची सोय करीत होते, तरीही या सुविधा कमी पडत होत्या. आता नवीन शैक्षणिक धोरणानुसार शिवाजी विद्यापीठाने बी. ए. स्पोर्टस अभ्यासक्रम सुरू केला. या अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राथमिक सोयी–सुविधा देण्यासाठी प्रशस्त क्रीडा विद्यार्थी–विद्यार्थीनी वसतिगृहाचे बांधकाम सुरू केले असून, हे बांधकाम पुर्णत्वाकडे जात आहे. अंतिम टप्प्यातील काम सुरू असून, वसतिगृहाचे उद्घाटन महिनाभरात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा बी. ए. स्पोर्टसला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थी–विद्यार्थीनींच्या राहण्याचा प्रश्न मिटला आहे. या वसतिगृहासाठी 3 कोटीचा निधी देण्यात आला आहे.
शिवाजी विद्यापीठ अंतर्गत सर्वच क्रीडा प्रकारातील खेळाडूंना प्रशिक्षण दिले जाते. यातून राष्ट्रीय–आंतरराष्ट्रीय पातळीवरदेखील खेळाडूंनी सुवर्णपदक मिळवून विद्यापीठाची मान उंचावली आहे. 18 खेळाडूंनी ऑल इंडिया विविध खेळांमधील स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले. अॅथलेटिक्समध्ये जनरल चॅम्पियनशिप मिळवली. खेलो इंडियामध्ये बाराव्या क्रमांकाचे स्थान मिळवले. फ्रान्स येथे झालेल्या स्पर्धेत बारा खेळाडूंपैकी 6 खेळाडू शिवाजी विद्यापीठाचे होते. शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार, अर्जुन पुरस्कार मिळवून विद्यापीठाची मान उंचावली आहे. त्यामुळेच खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी कुलगुरूंनी मॅटवरील कुस्ती संकुल, खेळाडू वस्तीगृहाची निर्मिती करून खेळाडूंना प्रोत्साहन दिले आहे. या वसतिगृहाचे काम अंतिम टप्प्यात असून एक महिन्याच्या आत काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. या वसतिगृहात 100 खेळाडू विद्यार्थी व 100 विद्यार्थीनींच्या राहण्याची सोय होणार आहे. येथेच मेस सुरू करून खेळाडूंना पौष्टिक आहार देण्याचा विद्यापीठाचा मानस आहे. तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर मेडल मिळवलेल्या खेळाडूंना प्रवेशासह वसतिगृहाच्या शुल्कात सुट मिळणार आहे. या वसतिगृहासाठी तीन कोटीचा खर्च केला असून सर्व सोपी–सुविधांनी परिपूर्ण वसतिगृह असणार आहे. हे वसतिगृह क्रीडांगणाजवळच असल्याने खेळांच्या सरावासाठी फार दूर जाण्याची गरज नाही. बाहेरगावाहून येणाऱ्या खेळाडूंच्या राहण्याचा प्रश्न मिटला आहे, त्यामुळे खेळाडू विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
- विद्यापीठ प्रशासनाकडून खेळाडूंना प्रोत्साहन
शिवाजी विद्यापीठ प्रशासन खेळाडूंना वेळप्रसंगी विमानाने जाण्याची परवानगी देवून खेळाडूंना प्रोत्साहन देते. त्याचबरोबर खेळाडूंसह प्रशिक्षकांच्या दैनंदिन भत्त्यात वाढ केली आहे. खेळाडूंना बाहेरगावी स्पर्धेला जाण्यासाठी प्रवासखर्चही दिला जातो. खेळाडूंना सर्वोत्परी मदत करण्याचे धोरण विद्यापीठ प्रशासनाचे आहे.
- खेळाडूंना या सुविधा मिळणार
विद्यार्थ्यांना पूरक डायट, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रशिक्षक प्रशिक्षण देणार आहेत. आयसीटीच्या माध्यमातून विविध खेळाच्या स्लाईड शो दाखवून चर्चासत्र आयोजित केली जाणार आहेत. वेळापत्रक तयार करून प्रत्येकाला त्याच्या खेळानुसार प्रशिक्षण आणि सराव करण्यासाठी शिस्त लावली जाणार आहे.








