पंढरपूर वारीच्या मार्गात ठेवला देह : आज अंत्यसंस्कार
मडकई : नागेशी बांदोडा येथील प्रसिद्ध कलाकार व नाट्यादिग्दर्शक शशिकांत विनायक नागेशकर (63) यांचे काल बुधवार 28 रोजी सकाळी आकस्मिक निधन झाले. पंढरपूरच्या वारीदरम्यान गोव्यातील एका वारकरी पथकासह भजनात सहभागी झालेल्या नागेशकर यांना हृदयविकाराचा झटका आला व वारीच्या मार्गातच त्यांनी देह ठेवला. पंढरपूरपासून आठ किलोमिटरच्या अंतरावर अलिकडे वारकऱ्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी ही दुर्दैवी घटना घडली.
शशिकांत नागेशकर हे एक उत्कृष्ट नाट्यादिग्दर्शक, चित्रकार, मूर्तीकार असे बहुआयामी व्यक्तीमत्त्व होते. सिद्धीनंदन थिएटर्स, ओम कलासृष्टी या नाट्यासंस्थासह फोंडा तालुक्यातील विविध संस्थांसाठी अनेक स्पर्धात्मक व उत्सवी नाटकांचे त्यांनी दिग्दर्शन केले होते. दूरदर्शनवरील काही मालिकांमध्येही त्यांनी अभिनय केला होता. यंदाच्या राज्यस्तरीय नाट्यास्पर्धेत ओम कलासृष्टीतर्फे सादर करण्यात आलेल्या ‘अहं देवयानी’ त्यांनी दिग्दर्शित केलेल्या नाटकाला प्रथम पारितोषिक प्राप्त झाले होते. शिवाय उत्कृष्ट दिग्दर्शनाचे ते मानकरी ठरले होते. नागेशी येथील प्रसिद्ध भजनी सप्ताहात चित्ररथ देखावा, चतुर्थीच्या काळात गणेशमूर्ती, चित्रकला अशा विविध कलांमध्ये ते गुंतलेले असायचे. नागेशकर हे गेल्या काही वर्षांपासून आषाढी वारी करीत होते. पंढरपूरच्या पायी वारीला जाणाऱ्या मूळगाव डिचोली येथील एका पथकाची वाटेत भेट घेऊन त्यांच्यासोबत पुढे पायी वारी करण्याचा त्यांचा क्रम असायचा. त्यानुसार गेल्या चार दिवसांपूर्वी नागेशकर व त्यांचे काही मित्र पंढरपूरकडे निघाले होते. पंढरपूरहून आठ किलोमिटर अलिकडे मुक्कामाच्या एका ठिकाणी वारकऱ्यांसह भजनात रंगलेले असताना अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आला व ते खाली कोसळले. ऊग्णवाहिका बोलावून इस्पितळात नेताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. आज गुऊवार 29 रोजी सकाळी 11 वा. अंत्यसंस्कार होणार आहेत. नागेशकर यांच्यापश्चात पत्नी शिल्पा, पुत्र ओंकार, मुलगी साक्षी तसेच भाऊ प्राचार्य नित्यानंद व विजयानंद असा परिवार आहे.
बहुआयामी कलाकार गमावला : मंत्री सुदिन ढवळीकर
शशिकांत नागेशकर यांच्या आकस्मिक निधनाबद्दल नाट्या व कला क्षेत्रातून दु:ख व्यक्त करण्यात येत आहे. मडकईचे आमदार तथा वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी ही घटना क्लेशदायक असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. नागेशकर यांच्या ऊपाने एक उत्कृष्ट व बहुआयामी कलाकार आम्ही गमावला आहे. नागेशकर हे मगो पक्षाचे खंदे कार्यकर्ते होते. पक्षाच्या जाहीर सभांमध्ये सूत्रसंचालनाची बाजू ते सांभाळीत. त्यांच्या अकाली जाण्याने मगो पक्षाबरोबरच व कलाक्षेत्राचेही मोठे नुकसान झाल्याची भावना मंत्री ढवळीकर यांनी व्यक्त केली आहे.









