शेतकऱ्यांना सर्व सुविधा देण्यात कारखाना अव्वल
सेनापती कापशी प्रतिनिधी
मारुतराव जाधव गुरुजी सहकारातील तज्ञ आहेत. त्यांच्याबद्दल मला आदर आहे. परंतु बिद्री साखर कारखान्यात सत्ताधाऱ्यांनी 96 कोटींचा ढपला पाडल्याचा त्यांचा आरोप हास्यास्पद आहे, असे प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. बिद्रीवरील या आरोपांच्या चर्चेसाठी आपण एकाच व्यासपीठावर येऊया, असे आवाहन आमदार मुश्रीफ यांनी केले.
गलगले, ता. कागल येथे विकासकामांच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार संजयबाबा घाडगे होते. बिद्रीचे अध्यक्ष माजी आमदार के. पी. पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आमदार मुश्रीफ पुढे म्हणाले, बिद्रीची निवडणूक पुढे ढकलून रडीचा डाव खेळू नका, थेट मैदानात या. आजच्या घडीला साखर कारखानदारी प्रचंड अडचणीतून जात आहे. इथेनॉल प्रकल्प नसेल तर टनामागे चारशे रुपये तोटा सहन करून कारखाने चालवावे लागत आहेत. विरोधकांना माझी विनंती आहे, इथेनॉल प्रकल्पाला विरोध करून नका. पूर्णत्वाच्या अंतिम टप्प्यात आलेला इथेनॉल प्रकल्प थांबवून तुम्ही काय साधणार आहात्। असा सवाल त्यांनी यावेळी केला.
संजयबाबा घाडगे म्हणाले, राजकीय समीकरणांमुळे एकेकाळी बिद्री साखर कारखाना निवडणुकीत आम्हीसुद्धा के. पी. पाटील यांच्या विरोधात होतो. परंतु कारखान्याच्या कारभारावर किंवा वैयक्तिक के. पी. पाटील यांच्यावर कधी टीका केली नाही. आता तर आम्ही त्यांच्या सोबतच आहोत.
बिद्री साखर कारखान्याने राज्यात उच्चांकी ऊस दराबरोबरच कामगारांचे पगार, ऊस तोडणी, वाहतूक बिले, 60 हजार शेतकरी सभासदांना सवलतीची साखर यासह ऊस विकासाच्या विविध योजना शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचविल्या असल्याचे के. पी. पाटील म्हणाले. 20 वर्षांपूर्वी सभासदांनी कारखान्याची सत्ता माझ्या हातात दिली. त्यावेळी कारखान्याची मालमत्ता 65 कोटी रुपये होती. आजघडीला कारखान्याची मालमत्ता 400 कोटींहून अधिक आहे. शेतकरी सभासदांच्या मालकीचे श्रमाचे हे सहकार मंदिर असल्याचेही ते म्हणाले.