पावसामुळे गटारी तुंबल्या, स्वच्छता करताना अडचणी
प्रतिनिधी/ बेळगाव
गणपत गल्ली परिसरात गटारींमध्ये प्रचंड कचरा साचल्याने तो काढण्यासाठी महापालिका स्वच्छता कर्मचाऱ्यांची शनिवारी दमछाक झाली. प्लास्टिक पिशव्या, बाटल्या, खराब कपडे, यासह इतर साहित्य गटारींमध्ये टाकण्यात येत असल्यामुळे गटारी तुंबण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे दुर्गंधी व डासांचे प्रमाण वाढल्याचे सांगण्यात येत आहे.
शुक्रवारी दुपारी झालेल्या धुवाधार पावसामुळे शहराच्या मध्यवर्ती भागातील गटारींमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले. पाण्यासोबत प्लास्टिक कचराही वाहून आल्याने काही ठिकाणी साचून गटारींचे पाणी रस्त्यांवरून वाहत होते. यामुळे नरगुंदकर भावे चौकात पाणी साचण्यास सुरुवात झाली. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर पाण्याचा निचरा झाला. परंतु गटारींमध्ये प्लास्टिकचा कचरा साचला होता.
शनिवारी सकाळपासून महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून गटारी स्वच्छतेचे काम सुरू होते. काही ठिकाणी फरशा काढून प्लास्टिकचा कचरा काढावा लागला. नागरिकांनी प्लास्टिक व इतर कचरा गटारींमध्ये न टाकता तो कचरा कुंड्यांमध्ये जमा करावा, अन्यथा संबंधितांवर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.









