कचऱ्यातील प्लास्टिक धोकादायक : खाद्य पदार्थांबरोबर प्लास्टिक पोटात जात असल्याने परिणाम गंभीर
बेळगाव : शहरात विविध ठिकाणी साचून असलेला कचरा भटक्या जनावरांसाठी जीवघेणा ठरू लागला आहे. विशेषत: कचऱ्यातील प्लास्टिक धोकादायक ठरू लागले आहे. शहरात कागद, प्लास्टिक आणि ई-कचऱ्याचे प्रमाण वाढू लागले आहे. दरम्यान भूक भागविण्यासाठी कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर तुटून पडणाऱ्या मोकाट जनावरांना धोका निर्माण झाला आहे. धोका टाळण्यासाठी मनपा कचऱ्याची तातडीने उचल करणार का? असा प्रश्नही प्राणीप्रेमींनी उपस्थित केला आहे. शहरात वेळेत कचऱ्याची उचल होत नसल्याने ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग पडून आहेत. यामध्ये टाकाऊ पदार्थ आणि प्लास्टिक व इतर ई-कचरा अधिक प्रमाणात आहे. टाकाऊ पदार्थ खाण्यासाठी गेलेल्या जनावरांच्या पोटात प्लास्टिक कचरा जावू लागला आहे. त्यामुळे जनावरांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे. मनपाकडून सुका व ओला कचरा वर्गीकरणाची संकल्पना राबविली आहे. मात्र काही ठिकाणी ओला व सुका कचरा व प्लास्टिकही एकाच ठिकाणी पडलेले दिसते.
कचऱ्याची उचल तातडीने करणे गरजेचे
शहरात भटक्या जनावरांची संख्या अधिक आहे. यामध्ये गाय, बैल आणि कुत्र्यांचाही समावेश आहे. चौकाचौकात साचून राहिलेल्या कचराकुंड्यांमधील खाद्य पदार्थ खाण्यासाठी जनावरांचा कळप दिसून येतो. दरम्यान खाद्य पदार्थाबाबत पोटात प्लास्टिक देखील जात असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे जनावरांना पोटफुगीबरोबर इतर असह्या वेदनांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे मनपाने तातडीने कचऱ्याची उचल करून मोकाट जनावरांना प्लास्टिकपासून दूर ठेवावे, अशी मागणीही होत आहे. शहरात दवाखान्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होवू लागली आहे. त्यामुळे ई-कचऱ्याच्या प्रमाणातही वाढ होत आहे. कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये ई-कचराही अधिक प्रमाणात दिसत आहे. भुकेलेल्या जनावरांच्या पोटात खाद्य पदार्थाबरोबर ई-कचराही जात असल्याचे दिसत आहे.
कचरा वर्गीकरण संकल्पना सुरळीत राबवा
शहरात पार्सल घेऊन जाणाऱ्या नागरिकांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे साहजिकच प्लास्टिकचे प्रमाण वाढले आहे. घरी आणलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या टाकाऊ पदार्थाबरोबर कचराकुंडीत फेकून दिल्या जातात. याच प्लास्टिक पिशव्या जनावरांसाठी अधिक धोकादायक ठरू लागल्या आहेत. त्यामुळे मनपाने ओला व सुका कचरा वर्गीकरणाची संकल्पा सुरळीत राबवावी.
जनावराच्या पोटातून शस्त्रक्रिया करून काढले प्लास्टिक
शहरात साचून राहिलेल्या कचऱ्यामध्ये टाकाऊ पदार्थ आणि प्लास्टिक असते. भुकेलेले जनावरे टाकाऊ पदार्थांबरोबर प्लास्टिकचेही सेवन करतात. त्यामुळे जनावरांना प्लास्टिकचा धोका उद्भवतो. गतवर्षी एक जनावराच्या पोटातून शस्त्रक्रिया करून प्लास्टिक काढण्यात आले आहे. त्यामुळे कचऱ्याचे वर्गीकरण करून साचलेला कचराही वेळेत उचल होणे आवश्यक आहे.
डॉ. आनंद पाटील-साहाय्यक निर्देशक पशुसंगोपन









