दुकानदारांकडून 4 हजार रुपये दंड वसूल
बेळगाव : शहरामध्ये प्लास्टिक विरोधी मोहीम शुक्रवारीही राबविण्यात आली. बसवेश्वर सर्कल परिसरातील दुकानांमध्ये जाऊन तपासणी करून प्लास्टिक जप्त करण्यात आले. याचबरोबर 4 हजार दंडदेखील वसूल करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरामध्ये प्लास्टिकवर निर्बंध आणण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या आदेशानुसार ही मोहीम राबविण्यात येत आहे. पर्यावरण समतोल ठेवण्यासाठी प्लास्टिक बंदी करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे महापालिकेचे कर्मचारी विविध ठिकाणी असलेल्या दुकानांवर धाडी टाकून प्लास्टिक जप्त करत आहेत. शुक्रवारी बसवेश्वर सर्कल-खासबाग, नाथ पै सर्कल या परिसरातील विविध दुकानांमध्ये जाऊन प्लास्टिक जप्त करण्यात आले. महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य निरीक्षक कलावती अडमनी, सुभाष गराणी, किरण देमट्टी यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत भाग घेतला होता.









