प्रतिनिधी/ बेळगाव
कणबर्गी येथे शनिवारी रेशन तांदळामध्ये प्लास्टिक तांदूळ मिळाल्याने लाभार्थ्यांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. तांदूळ शिजविल्यानंतर तो वेगळा दिसू लागल्याने त्याची तपासणी करण्यात आली. त्यावेळी तांदूळ प्लास्टिकचा असल्याचे निदर्शनास आले. हा एक प्रकारचा नागरिकांच्या जीवाशी खेळ असून संबंधितांवर कारवाईची मागणी केली जात आहे.
मागील काही दिवसांपासून रेशनच्या तांदळात सातत्याने प्लास्टिकचे तांदूळ मिसळण्याचे प्रकार घडत आहेत. ज्या लाभार्थींना याबद्दलची माहिती नाही, ते या तांदळाचे सेवन करत आहेत. पाण्यामध्ये भिजवल्यानंतर हा तांदूळ रबरप्रमाणे ताणला जात आहे. तसेच शिजवल्यानंतरही तो वेगळा दिसत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यापूर्वी अनेक गावांमध्ये प्लास्टिक तांदूळ सापडला असला तरी अद्याप कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही.
शनिवारी कणबर्गी येथे काही लाभार्थींच्या तांदळात प्लास्टिकचा तांदूळ असल्याचे निदर्शनास आले. यामुळे महिलांनी संताप व्यक्त केला. नागरिकांच्या जीवाशी चाललेला हा खेळ त्वरित बंद करावा, अशी मागणी महिलांनी केली आहे.









