ग्राहक न्यायालयाने ठोठावला 40 हजाराचा दंड
प्रतिनिधी / बेळगाव
प्लास्टिक नूडल्स दिल्याबद्दल संबंधित कंपनीविरोधात ग्राहक न्यायालयात दावा दाखल करण्यात आल्यानंतर न्यायालयाने त्या कंपनीला दंड ठोठावला आहे. गोकाक येथील माणिक्य महेश मल्लाडी या सहा वर्षाच्या मुलाला ‘सनफिस्ट इप्पी नूडल्स मॅझिक मसाला-पुणे या कंपनीचे नूडल्स तयार करून खायला दिले होते. ते खाल्ल्यानंतर काहीवेळातच माणिक्यला उलटी सुरू झाली. त्यामुळे पालकांना संशय आला. त्यांनी त्या नूडल्सची तपासणी केली असता त्यामध्ये प्लास्टिक असल्याचे आढळून आले. या घटनेनंतर खरेदी केलेल्या धारवाड येथील दुकानदाराकडे तक्रार केली. मात्र त्यांनी दाद दिली नाही.

त्यामुळे माणिक्यचे वडील महेश सिद्धाप्पा मल्लाडी यांनी पुण्याच्या नूडल्स तयार करणाऱ्या कंपनीविरोधात तसेच कोलकाता येथील इंडिया टोबॅको कंपनी वितरक यांच्या विरोधात बेळगाव येथील ग्राहक न्यायालयात दावा दाखल केला. त्याठिकाणी न्यायाधिशांनी सर्व पुरावे तसेच साक्षी तपासले. त्यामध्ये दोषी आढळल्याने पुण्याच्या त्या नूडल्स कंपनीला आणि वितरक कंपनीला 40 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. ग्राहक जागृत झाल्यामुळे हे प्रकरण उघडकीस आले. त्यानंतर न्यायालयात दाद मागितली. त्यामुळे न्यायालयाने त्यांना दिलासा दिला आहे. अशाप्रकारे कोणत्याही कंपनीच्या पदार्थामध्ये फसवणूक झाली तर ग्राहक कायद्यानुसार दाद मागू शकतो, हे आता प्रत्येकाने लक्षात घेणे गरजेचे आहे.









