वृत्तसंस्था/ वाराणसी
शिवाचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काशी नगरीने आता स्वच्छतेकडे एक मोठे पाऊल उचलले आहे. श्रद्धा आणि भक्तीचे केंद्र असलेल्या काशी विश्वनाथ मंदिराने आता प्लास्टिकच्या वापरावर पूर्णपणे बंदी घातली आहे. शहर प्लास्टिकमुक्त करण्याच्या उद्देशाने मंदिर प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे. 10 ऑगस्ट 2025 पासून लागू झालेल्या या नवीन नियमांनुसार, आता मंदिरात येण्राया भाविकांना खबरदारी घेऊन मंदिरात दर्शनासाठी यावे लागेल.
काशी विश्वनाथ मंदिराच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, मंदिर परिसरात कोणत्याही प्रकारचे प्लास्टिक आणण्यास आता पूर्णपणे बंदी आहे. त्यानुसार आता प्लास्टिकमध्ये पॅक केलेले कोणतेही अन्न किंवा पूजा साहित्य मंदिरात नेले जाऊ शकत नाही. फुले, फळे, प्रसाद किंवा इतर पूजा साहित्यासाठी पॉलिथिन बॅग्ज आणण्यास बंदी आहे. पाणी किंवा पंचामृत इत्यादींसाठी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या भांड्यांना देखील मनाई आहे. प्लास्टिकऐवजी, आता कागद, कापड किंवा मातीपासून बनवलेल्या पर्यायांचा वापर करण्याचा सल्ला दिला जात आहे.









