वार्ताहर /कडोली
कर्नाटक शासनाच्या सॉलिड अँड लिक्विड वेस्ट मॅनेजमेंट योजनेंतर्गत जि. पं. आणि कडोली ग्रा. पं. यांच्यामार्फत प्रत्येक कुटुंबाला प्लास्टिक बादली वितरणाचा शुभारंभ करण्यात आला. प्रत्येक घरासमोर आता लवकरच कचरा गाडी येणार आहे.
घरातील केरकचरा बाहेर फेकून घाणीचे साम्राज्य तयार होत होते. घरासमोरील स्वच्छतेबरोबर घरातील केरकचऱयाचाही निचरा व्हावा यासाठी कर्नाटक शासनाच्यावतीने सॉलिड अँड लिक्विड वेस्ट मॅनेजमेंट ही योजना अंमलात आणून प्रत्येक घरी प्लास्टिक बादली देण्याचा निर्णय घेतला आहे. कडोली ग्रा. पं. क्षेत्रात 4016 कुटुंबांना बादली देण्याचा शुभारंभ नुकताच कार्यालयात पार पडला.
कचरा गाडी फिरणार
बादलीतील जमा झालेला कचरा कचरागाडीत टाकावा लागणार आहे. यासाठी गावात कचरागाडी फिरणार आहे. बादली वितरण शुभारंभ कार्यक्रमप्रसंगी ग्रा. पं. उपाध्यक्षा प्रेमा नरोटी, सदस्य राजू मायाण्णा, गौडाप्पा पाटील, लक्ष्मी कुट्रे, सुनील पावणोजी, कर्मचारी आणि महिला उपस्थित होत्या.
कामगारांना शर्ट-टोपीचे वितरण
प्लास्टिक बादली वितरण शुभारंभ कार्यक्रमाचे औचित्य साधून जि. पं. आणि ग्रा. पं. वतीने रोजगार हमी योजनेत ज्या कामगारांचे वर्षभरात कामाचे शंभर दिवस भरले त्या प्रत्येकांना शर्ट आणि टोपीचे वितरण करण्यात आले.









