मंत्री रामलिंगारेड्डी यांची विधानपरिषदेत माहिती
बेंगळूर : धर्मादाय खात्याच्या अखत्यारित येणाऱ्या राज्यातील मंदिरांमध्ये 15 ऑगस्टपासून प्लास्टिक वापरावर पूर्णपणे बंदी घालण्यात येईल, अशी माहिती धर्मादाय व परिवहन मंत्री रामलिंगारेड्डी यांनी विधानपरिषदेत दिली. विधापरिषद सदस्य मधू मादेगौडा यांनी विचारलेल्या प्रश्नावर मंत्री रामलिंगारेड्डी यांनी उत्तर दिले. धर्मादाय गाते 15 ऑगस्टपासून राज्यातील सर्व मंदिरांमध्ये प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी करणार आहे. यासंबंधीचा आदेश जारी केला जाईल. मंदिरांमध्ये प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले. धर्मादाय खात्याला मंदिरांमध्ये निर्बंधासंबंधीचे आदेश जारी करण्याचे अधिकार आहेत. मंदिरांच्या आवारात हा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जारी करावा. प्लास्टिक वापरमुळे पर्यावरण आणि मानवी आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होत आहे. त्यामुळेच प्लास्टिक वापरावर बंदी घालण्यात येत असल्याचे सांगून त्यांनी सरकारच्या कार्यवाहीचे समर्थन केले.









