पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांची माहिती
बेळगाव : कर्नाटक राज्योत्सव दिनानिमित्त 1 नोव्हेंबर रोजी शहरात मिरवणुकीचे आयोजन केले जाते. मात्र सदर मिरवणुकीत प्लाझ्मा म्युझिक सिस्टीम आणि लेझरवर बंदी घालण्यात आली आहे. डीजेचा आवाज निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त ठेवण्यात येऊ नये, काही दुर्घटना घडल्यास त्याला डीजे ओनर, ऑपरेटर आणि आयोजकांना जबाबदार धरण्यात येईल, असा इशारा पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी मंगळवार दि. 28 रोजी प्रसार माध्यमांशी बोलताना दिला आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्योत्सव दिनानिमित्त पोलीस फौजफाटा तैनात असणार आहे. स्थानिक पोलिसांसह परजिल्ह्यांतून पोलिसांना पाचारण करण्यात येणार आहे. कोणत्याही प्रकारची अनूचित घटना घडू नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे. गतवर्षीच्या राज्योत्सव मिरवणुकीचा व्हिडिओ पाहून त्यावर अभ्यास करण्यात आला आहे. चन्नम्मा चौकात सर्वजण एकत्र येत गर्दी करतात. त्यामुळे त्याठिकाणी गर्दी होऊ नये यासाठी कोणालाही मंडप घालण्यास परवानगी दिली जाणार नाही.
…अन्यथा आयोजक जबाबदार
ड्रोन कॅमेऱ्याद्वारे नजर ठेवली जाणार आहे. पोलिसांना रिफ्लेक्टर्सचे जॅकेट दिले जाणार आहेत. त्याचबरोबर प्लाझ्मा म्युझिक सिस्टीम आणि लेझरवर बंदी घालण्यात आली आहे. ध्वनिप्रदूषण होऊ नये, यासाठी निर्धारित मर्यादेपेक्षा डीजेचा आवाज ठेवण्यात येऊ नये, कोणतीही दुर्घटना घडल्यास त्याला डीजे ओनर, डीजे आपॅरेटर व आयोजकांना जबाबदार धरण्यात येईल. मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस खात्याला सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस आयुक्तांनी केले आहे.









