चिपळूण :
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणात काम पूर्ण झालेल्या ठिकाणी कंत्राटदार कंपनीकडून वृक्ष लागवड करण्यात आली. मात्र लागवडीनंतर त्याची पुरेशी देखभाल न केल्याने लागत असलेल्या वणव्यांमध्ये रोपे होरपळत आहेत. सोमवारी महामार्गावर कोंडमळा सीमेवर लागलेल्या वणव्यात लागवडीतील रोपांचे नुकसान झाले आहे.
महामार्ग चौपदरीकरणात हजारो वृक्षांची कत्तल करण्यात आली. महामार्ग पूर्ण झाल्यानंतरही वृक्ष लागवडीकडे लक्ष दिले जात नसल्याने अखेर पर्यावरण प्रेमींना आंदोलनात्मक पावले उचलावी लागली. त्यातूनच मग कंत्राटदार कंपनीला वृक्ष लागवड करावी लागली. स्थानिक प्रशासनाने गेल्यावर्षी सावर्डे पट्ट्यात शेकडो झाडे लावली. त्यासाठी प्रत्येक विभागातील त्या-त्या तलाठी किंवा मंडल अधिकाऱ्यांनी लावलेल्या झाडांची देखभाल करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली.








