नागठाणे :
नागठाणे शेंद्रे भागात सध्याचे दिवसांत आले पीक लागणीस युद्धपातळीवर सुरुवात झाली आहे. मागील काही दिवसांपूर्वी अवकाळी पावसाने जोरदार तडाका दिल्यामुळे नागठाणे शेंद्रे भागात दरवर्षी प्रमाणे अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर होणारी या आले पिकाची लागण सुमारे दीड महिने लांबणीवर पडली होती. त्यामुळे भागातील बळीराजा खूप चिंतेत होता खरा ? परंतु त्यानंतर अवकाळी पावसाने दिलासादायक उसंत दिल्यामुळे आणि आठवड्यानंतर शेतास चांगली घात आल्यामुळे नागठाणे शेंद्रे भागात आले पीक लागणीस मोठ्या उत्साहात सुरुवात करण्यात आली असल्याचे दिसून आले.
नागठाणे शेंद्रे भागात नगदी पीक म्हणून प्रामुख्याने आले पिकाकडे पाहिले जाते. यामध्ये काही वर्षांपूर्वी वाफे पद्धतीने आले लागण करण्यात येत होती परंतु सध्याच्या काळात पूर्वीची वाफे पद्धत आता पूर्णपणे नामशेष झाली आहे. त्यामुळे आता काळानुरूप बदल झाल्यामुळे सध्याच्या दिवसात शेतामध्ये बैलांचे साथीने किंवा टॅक्टरच्या साहाय्याने सरी पद्धतीने बेड घातले जातात. त्यानंतर प्रत्येक बेडवर प्रामुख्याने दोन कुडी ते तीन कुडी प्रमाणे लागण करण्यात येते. यानंतर ठिबक किंवा तुषार सिंचन अथवा पोगरच्या सहाय्याने पिकास पाणी देण्याची व्यवस्था करण्यात येते.
नागठाणे शेंद्रे भागात सध्याच्या दिवसांत आले पिकाच्या एक गाडी अर्थात ५०० किलो बियाण्यारा १५ हजार रुपये असा दर आहे, तसेच जुन्या आले पिकास ९ हजार रुपये पर्यंत असा दर आहे. तरीही पुढे मागे या जुन्या आले पिकाचा दर वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सध्याचे दिवसांत आले पीक लागणीची कामे मोठ्या जोमाने सुरू असून भागातील बळीराजा या पीक लागणीच्या कामात पूर्णपणे व्यस्त असल्याचे चित्र समोर दिसत आहे.
वर्षभर चालणाऱ्या या पिकावर नागठाणे शेंद्रे परिसरातील बळीराजा पूर्णपणे निर्भर असून, भाजी मंडईच्या माध्यमातून वर्षभर आपली उपजीविका चालवत असतो. गेले काही दिवसांपूर्वी नागठाणे शेंद्रे भागात झालेल्या अवकाळीच्या अतिवृष्टीमुळे भागातील गावांतील शेतकऱ्यांच्या विहिरी पाण्याने तुडुंब भरल्या असल्यामुळे सध्याच्या दिवसांत तरी या आले पिकासाठी पाण्याची कमतरता भासणार नाही असे चित्र स्पष्ट दिसत आहे.
त्यामुळे बळीराजा मनोमन सुखावला असला तरीही पुढे होणाऱ्या मान्सून पावसाच्या आगमनाच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसत आहे. दीड महिने झाले लांबणीवर पडलेली ही आले पिकाची लागण आता जोमाने सुरू झाली असून जून महिन्यात ही लागण पूर्ण होईल असा विश्वास बळीराजाकडून व्यक्त करण्यात येत आहे…..!








