सामाजिक वनीकरण विभागाचा उपक्रम : वनमहोत्सव सप्ताहानिमित्त आयोजन : आंतरराष्ट्रीय रेसर कृष्णराज महाडिक यांच्या हस्ते कार्यक्रम
प्रतिनिधी/कोल्हापूर
सामाजिक वनीकरण कोल्हापूर विभागाच्या वतीने वृक्ष लागवडीचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्याअंतर्गत करवीर तालुक्यात 52 हजार 888 वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. त्यापैकी दऱयाचे वडगांव मधील पडिक जागेत बुधवारी वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. आंतरराष्ट्रीय कार रेसर कृष्णराज महाडिक यांच्या हस्ते आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्यात आला.
सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने 1 ते 7 जुलै या कालावधीत वन महोत्सव साजरा केला जातोय. त्यासाठी गट लागवड योजनेअंतर्गत गायरान, मुलकीपड आणि महसुल विभागाच्या रिकाम्या जमिनीवर वृक्षारोपणाचा उपक्रम राबवण्यात येत आहे. रिकाम्या जागेत 1 हेक्टरवर 1111 प्रमाणं 3 हजार 333 रोपे लावली जात आहेत. करवीर तालुक्यातील दऱयाचे वडगाव येथे सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला. कृष्णराज महाडिक यांच्या हस्ते आणि पृथ्वीराज महाडिक, विजयराव महाडिक यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण संवर्धनासाठी वृक्ष लागवड मोठया प्रमाणात करणे गरजेचे आहे. त्यामुळं सामाजिक वनीकरणाच्या उपक्रमात आपण पुढाकार घेतला असून, सोशल मीडियाच्या माध्यमातून वृक्षारोपणाबाबत केलेल्या जनजागृतीला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे कृष्णराज महाडिक यांनी सांगितले.
तर वृक्षारोपण हा पृथ्वी आणि पर्यावरण संवर्धनासाठीचा महत्वाचा भाग आहे. ग्लोबल वॉर्मिंग विरोधात काम करणार्या सर्व संस्था, नागरिकांनी त्यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याची गरज असल्याचे विविध स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी सांगितले. करवीर तालुक्यात 52 हजार 888 वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट असून, ते लवकरच पूर्ण करणार असल्याचे वनक्षेत्रपाल प्रियांका दळवी यांनी सांगितले.
यावेळी वनपाल अंबाजी बिराजे, अमोल शिंदे, वन रक्षक विकास घोलप यांच्यासह धनंजय महाडिक युवाशक्ती, ड्रीम टीम फौंडेशन, टीम केएम, फुलेवाडीचे केअर फौंडेशन, पैजारवाडीचे संदीप गवळी, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते आणि दर्याचे वडगावसह परिसरातील भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, सकाळच्या सत्रात विवेकानंद महाविद्यालयामध्ये कृष्णराज महाडिक यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. विविध प्रजातींच्या झाडांची लागवड यावेळी करण्यात आली. तर केशर आंबा जातीची 100 रोपे कृष्णराज महाडिक यांनी महाविद्यालयाला भेट दिली. काही रोपे विद्यार्थ्यांना दत्तक म्हणून देण्यात आली. संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, प्राचार्य आर आर कुंभार यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमावेळी प्रा. बी एस लाड, प्रा. शिल्पा भोसले, प्रा. अशोक पाटील, प्रा. ए आर धस, सी बी दोडमनी यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.









