रंगरंगोटीचा केवळ दिखाऊपणा
बेळगाव : कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सोमवार दि. 4 पासून सुरुवात होणार आहे. यासाठी शहर परिसरात रंगरंगोटी करण्यात येत आहे. दुभाजकांवर ऐन हिवाळ्यात वृक्षारोपण करण्याचा अजब कारभार प्रशासनाकडून केला जात आहे. त्यामुळे केवळ अधिवेशनासाठी हा खटाटोप सुरू असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. एरवी दुभाजकांवर कितीही अस्वच्छता असली तरी त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाकडून आता मात्र वृक्षारोपण करून त्याला पाणी घातले जात आहे. वास्तविक पाहता पावसाळ्याच्या दिवसातच वृक्षारोपण करणे आवश्यक असते. परंतु अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केवळ दिखाव्यासाठी कॅम्प ते चन्नम्मा चौकापर्यंत दुभाजकांवर वृक्षारोपण केले जात आहे. अधिवेशनासाठी वृक्षारोपणाचा घाट घातला जात आहे का? असा प्रश्न सर्वसामान्यांतून उपस्थित केला जात आहे.
गोगटे उड्डाण पुलावरील पथदीप सुरू करण्याला मुहूर्त कधी?
अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्वच दुभाजकांना रंगरंगोटी केली जात आहे. मागील वर्षभरापासून गोगटे उड्डाण पुलावरील स्वच्छता तसेच देखभालीकडे ढुंकूनही न पाहणाऱ्या प्रशासनाने आता मात्र रंगरंगोटी सुरू केली आहे. परंतु मागील अनेक दिवसांपासून बंद पडलेले पथदीप किमान अधिवेशनाच्या वेळी तरी सुरू होणार का? असा प्रश्न सर्वसामान्यांमधून विचारला जात आहे. गोगटे उड्डाण पुलावरून अंधारातूनच प्रवाशांना ये-जा करावी लागत असल्याने नाराजीचा सूर उमटू लागला आहे.









