शेतकरीवर्ग अद्याप दमदार पावसाच्या प्रतीक्षेत : मजुरांचा भाव वाढला
वार्ताहर /जांबोटी
जांबोटी-कणकुंबी भागात गेल्या चार दिवसापासून संततधार सुरू आहे. पाणथळ शेतवडीत भातरोप लागवडीसाठी पोषक वातावरण निर्माण झाल्यामुळे या भागात शेतकरीवर्गाने भातरोप लागवडीच्या कामांना प्रारंभ केले आहे. खानापूर तालुक्मयाच्या पश्चिम भागातील शेतकरीवर्ग भातपेरणीऐवजी रोप लागवड मोठ्याप्रमाणात करतात. साधारणपणे जून महिन्याच्या प्रारंभी भातरोप लागवडीसाठी आवश्यक तऊची पेरणी करण्यात येते. भातरोपांची उगवण झाल्यानंतर वीस ते पंचवीस दिवसानंतर भातरोपांची लागवड करण्यात येते. यासाठी संततधार पाऊस तसेच शेतवडीत मुबलक पाण्याची आवश्यकता असते. मात्र यावर्षी मान्सूनला विलंबाने सुरुवात झल्यामुळे रोपांची वाढ झाली नसल्यामुळे तसेच शेतवडीत आवशक्मय पाणीसाठा नसल्याने रोप लागवडीच्या कामांना काहीसा उशिरानेच प्रारंभ झाला. त्यामुळे ईतर शेतजमीन व माळरानावरील रोप लागवडीची कामे लांबणीवर पडली असून शेतकरी धुवाधार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. गेल्या दहा-पंधरा वर्षापासून शेतकरी पॉवर ट्रिलरसारख्या आधुनिक अवजारांचा वापर करून भातरोप लागवडीसाठी आवश्यक मशागतीची कामे करत असल्यामुळे आता रोप लागवडीची कामे सोपी झाली आहेत. मात्र मोठ्याप्रमाणात मनुष्यबळाची आवश्यकता भासते. मजुरीचे दरदेखील गगनाला भिडले असल्यामुळे, उत्पादन खर्चातही वाढ झाली आहे. या भागातील भातरोप लागवडीची कामे नागपंचमीपर्यंत पूर्ण होण्याची शक्मयता आहे.









