वनखात्यामार्फत वनमहोत्सवांतर्गत रोपलागवडीला प्राधान्य
बेळगाव : वनखात्यातर्फे 1 ते 7 जुलैपर्यंत वनमहोत्सव कार्यक्रम हाती घेतला जातो. या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी रोपलागवड केली जात आहे. विश्वेश्वरय्यानगर येथील शाळेच्या आवारात 45 हून अधिक फळझाडे लावण्यात आली. त्यामुळे शाळेच्या सौंदर्यात भर पडणार आहे. शिवाय विद्यार्थ्यांना शाळेतच विविध फळांची चव चाखता येणार आहे. वनखात्यामार्फत दरवर्षी लाखो झाडांची लागवड करून पर्यावरणाचा समतोल राखला जात आहे. यंदाही लाखो रोपांची लागवड केली जाणार आहे. पावसाअभावी लागवड लांबणीवर पडली होती. मात्र, आता पावसाला सुरुवात झाल्याने रोपलागवडीचे काम हाती घेतले आहे. शाळेतील विद्यार्थ्यांच्या हस्ते रोपलागवडीला चालना देण्यात आली. यावेळी सीसीएफ मंजुनाथ चव्हाण, मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी, डीएफओ पी. के. प्रशांत, आरएफओ पुरुषोत्तम रावजी, विनय गौडर यासह कर्मचारी, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.









