लाखो रोपांची निर्मिती : पावसाळ्यात होणार लागवड, शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात देणार रोपे
बेळगाव : वृक्ष संपदेत वाढ करण्यासाठी वनखात्यामार्फत नर्सरीतून रोपवाटीकेचे काम सुरू झाले आहे. येत्या पावसाळ्यात ही रोपे विविध भागात लावली जाणार आहेत. यासाठी आतापासून बियाणे घालून रोप निर्मितीला चालना देण्यात आली आहे. विशेषत: वन्यप्रदेशात लावण्यात येणाऱ्या रोपांची निर्मिती केली जात आहे. वनक्षेत्र वाढविण्याबरोबर पर्यावरण संवर्धनासाठी दरवर्षी लाखो रोपांची लागवड केली जाते. पावसाळ्याच्या सुरुवातीला ही रोपे विविध ठिकाणी लावली जातात. आतापासून नर्सरीमध्ये या रोपांची निर्मिती केली जात आहे. बेळगाव विभागातील गोल्याळी, नागरगाळी, मच्छे, ओतोळी, लोंढा आदी ठिकाणी नर्सरी आहेत. या नर्सरीमधून रोप निर्मितीला प्रारंभ झाला आहे. विशेषत: वळिवाच्या पावसाची साथ देखील या रोप निर्मितीला मिळू लागली आहे.
वन क्षेत्राबरोबर सामाजिक वनीकरण विभागामार्फत विविध रस्ते, सरकारी शाळा, शासकीय कार्यालये, प्राथमिक आरोग्य केंद्र, खुल्या जागा आदी ठिकाणी लागवड केली जात आहे. दरवर्षी हजारो रोपे लावली जातात. या रोपांसाठी आता नर्सरीतून रोपवाटीकेचे काम सुरू झाले आहे. प्लास्टिक पिशव्यांमध्ये ही रोपवाटिका तयार केली जात आहे. त्याबरोबर शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात रोपे दिली जाणार आहेत. वनखाते वन्यप्रदेशात तर सामाजिक वनीकरण विभाग मानवी वसतीत रोप लागवडीला प्राधान्य देते. सध्या होत असलेल्या वळीव पावसामुळे रोपवाटिकेच्या कामाला सोयीस्कर होऊ लागले आहे. त्यामुळे नर्सरीतील रोपांची जोमाने वाढ होणार आहे.
फणस, आंबा, वड, सागवान यासह वन रोपांची निर्मिती
बेळगाव विभागात असलेल्या नर्सरीतून रोपे तयार करण्याच्या कामाला प्रारंभ झाला आहे. मच्छे येथील नर्सरीमध्ये विविध प्रकारची रोपे तयार केली जात आहे. त्यामध्ये फणस, आंबा, वड, सागवान यासह वन रोपांची निर्मिती केली जात आहे.
-पुरुषोत्तम रावजी (आरएफओ)









