सांगली :
संगम’ सांगली महानगरपालिकेने ‘हरित उपक्रमाअंतर्गत तीन वर्षांत एक लाख झाडे लावण्याची घोषणा केली असली, तरी त्यात देशी झाडांना प्राधान्य न दिल्याने पर्यावरणप्रेमी कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलन सुरू केले आहे. “देशी झाडे लावणे १०० टक्के अनिवार्य व्हावे आणि विदेशी झाडांची खरेदी थांबवावी” अशी ठाम मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे.
आठ सप्टेंबर रोजी नेचर कॉन्झर्वेशन सोसायटीचे कार्यकर्ते तबरेज खान, रोहन पाटील, कौस्तुभ पोळ, अमोल जाधव, हर्षद दिवेकर, अरविंद सोमण, विशाल कोठावळे, अनिकेत ढाले आणि सचिन हजारे या-‘नी आयुक्तांना निवेदनासोबत एक देशी झाडांचे रोप देऊन आंदोलनाची सुरुवात केली होती. या निवेदनासोबत विदेशी झाडांना पर्यायी देशी झाडांची यादीही सादर करण्यात आली होती. मात्र, आजतागायत महापालिकेकडून कोणताही कागदोपत्री प्रतिसाद मिळालेला नाही.
कार्यकर्त्यांनी “देशी झाड भेट आंदोलन” सुरूच ठेवले आहे, मागणी मान्य होईपर्यंत दररोज एक देशी झाड आयुक्तांना भेट दिले जात आहे. आंदोलनाला विविध जिल्ह्यांतून पाठींबा मिळत असून आयुक्तांना भेट देण्यासाठी देशी झाडांचा ओघ वाढला आहे
महापालिकेची भूमिका याबाबतीत वादग्रस्त ठरत असून, पर्यावरणप्रेमींनी दिलेली दुर्मिळ देशी झाडे महापालिकेकडून हेळसांड होत असल्याचेही निदर्शनास आले आहे. कार्यकर्त्यांचा प्रश्न असा की, “चार झाडे नीट जपता येत नसतील तर मग एक लाख झाडे कशी जगवतील?” ३.५ कोटींचा फंड उपलब्ध असल्याची शक्यता असूनही सी एस आर फंडाची मागणी का केली जात आहे, यावरही संशय व्यक्त होत आहे. अज्ञात परिणाम असलेल्या विदेशी झाडांची निवड झाल्याने महापालिकेच्या धोरणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
- आदेश निघेपर्यंत आंदोलन सुरूच
आम्ही दिलेली झाडे हा सत्कार नसून व्यवस्थेला लवकर बुद्धी यावी, झाडांचे महत्त्व कळावे आणि योग्य तो निर्णय घ्यावा यासाठी ही झाडे देतो आहोत. “देशी झाडे लावण्याचा आदेश निघेपर्यंत आंदोलन सुरू राहील आणि गरज पडल्यास ते आणखी तीव्र करण्यात येईल.”, असे पर्यावरण प्रेमीनी रपष्ट केले.








