पर्यावरणप्रेमींतून नाराजी : रोप खरेदीसाठी प्रतीक्षा
बेळगाव : बागायत शेतकरी आणि पर्यावरणप्रेमींना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी भरविण्यात येणारा रोपबाजार यंदा लांबणीवर पडला आहे. त्यामुळे पर्यावरणप्रेमींतून नाराजी व्यक्त होत आहे. पावसाला सुरुवात झाली की, दरवर्षी रोपबाजार भरतो. मात्र यंदा अद्याप रोपबाजार भरविण्यासाठी कोणत्याच हालचाली दिसत नाहीत. बागायत खात्यामार्फत क्लब रोड येथील ह्यूम पार्कमध्ये हा बाजार भरवून विविध रोपांचे प्रदर्शन आणि विक्री केली जाते. शिवाय रोपलागवडीबाबत मार्गदर्शन केले जाते. मात्र अद्याप अनुदान मिळाले नसल्याने रोपबाजार लांबणीवर पडला आहे. या रोपबाजारात आंबा, लिंबू, कडीपत्ता, चिकू, नारळ, फणस, पेरू, कडूनिंब यासह शोभिवंत गुलाब, मोगरा, पाम, जास्वंदी, पुष्प रोपे विक्री केली जातात. त्यामुळे या रोपबाजाराला नागरिकांचा प्रतिसादही उदंड मिळतो. मात्र यंदा अद्याप रोपबाजार भरला नसल्याने नाराजी व्यक्त होऊ लागली आहे.
सवलतीच्या दरात रोपे विक्री
दमदार पावसाला सुरुवात झाली की दरवर्षी जूनच्या शेवटच्या किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात हा रोपबाजार भरवून विविध रोपांची विक्री केली जाते. एकाच छताखाली रोपे मिळतात. त्यामुळे नागरिकांची गर्दीदेखील होते. विशेषत: बागायत खात्याकडून सवलतीच्या दरात ही रोपे विक्री केली जातात. त्यामुळे पर्यावरणप्रेमी या रोपबाजाराची अतुरतेने वाट पाहतात. मात्र यंदा जुलैचा पहिला आठवडा संपला तरी रोपबाजार भरविण्यात आला नाही.
अनुदान मिळाल्यानंतर रोपबाजार भरवणार
शासनाकडून रोपबाजार भरविण्यासाठी अनुदान अद्याप उपलब्ध झाले नाही. येत्या काही दिवसांत अनुदान मिळाल्यानंतर रोपबाजार भरविला जाणार आहे. गतवर्षी भरविलेल्या रोपबाजाराला नागरिकांचा प्रतिसाद मिळाला होता. यंदादेखील रोपबाजार भरविण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला आहे.
महांतेश मुरगोड (सहसंचालक बागायत खाते)









