सेंद्रिय शेती, मध, आळंबी, शोभिवंत फळे-फुलांची माहिती-विक्री
प्रतिनिधी / बेळगाव
बागायत शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी 25 ते 27 ऑगस्टपर्यंत बागायत खात्यातर्फे वनस्पती महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. याअंतर्गत सेंद्रीय खते, बागायत शेती, गांडुळ खत, आळंबी उत्पादन, मध उत्पादन, भाजीपाला, विविध शोभिवंत रोपांची सवलतीच्या दरात विक्री केली जाणार आहे. बागायत, शेतकरी आणि नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
बागायत क्षेत्र वाढावे यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. यंदा खात्याने बागायत महोत्सव आयोजित करून शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला आहे. आंबा, पेरू, काजू, चिकू, फणस, लिंबू, नारळ यासह शोभिवंत झाडे, भाजीपाला आदींची विक्री केली जाणार आहे. त्याबरोबरच मध उत्पादन आणि आळंबी उत्पादनाबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.
आज उद्घाटन
बागायत खात्यामार्फत आयोजित करण्यात आलेल्या वनस्पती महोत्सवाचे शुक्रवार दि. 25 रोजी सायंकाळी 4 वा. क्लब रोड येथील ह्यूम पार्कमध्ये उद्घाटन होणार आहे. पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते या कार्यक्रमाला चालना मिळणार आहे. याबरोबरच विविध मंत्री, मान्यवर मंडळी आणि इतर उपस्थित राहणार आहेत.









