रोगांपासून दूर ठेवण्यासाठी उचलले पाऊल
प्रतिनिधी /बेळगाव
जनावरांच्या विविध रोगांविषयी आणि शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी एकदिवशीय शिबिर पार पडले. यामध्ये जनावरांना होणाऱ्या रोगांविषयी आणि त्यांना पुरविण्यात येणाऱ्या विविध योजनांविषयी माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली. अलीकडे जनावरांना विविध रोगांची लागण होत आहे. त्यामुळे जनावरांची काळजी कशी घ्यावी, याबाबत पशुपालकांना माहिती देण्यात आली.
जिल्ह्यात लम्पीने धुमाकूळ घालून हजारो जनावरांचा बळी घेतला. त्यामुळे पशुपालक धास्तावले आहेत. दरम्यान, पशुसंगोपन खात्याने विविध रोगांविषयी जनजागृती सुरू केली आहे. खबरदारी म्हणून जनावरांवर कोणते उपचार करावेत, रोगाची लागण झाल्यानंतर कोणती काळजी घ्यावी, याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळ्याच्या तेंडावर जनावरांना विविध आजारांची लागण होते. दरम्यान, रोगापासून जनावरे दूर कशी ठेवावीत आणि दूध उत्पादनात वाढ करून व्यवसायाला बळकटी कशी द्यावी, याबाबत माहिती देण्यात आली.
राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या जय किसान भाजी मार्केटमध्ये शेतकऱ्यांची वर्दळ असते. काही ठिकाणी पशुसंगोपनने शिबिर आयोजित करून जनावरांविषयी माहिती दिली. शासनाच्या जनावरांसाठीच्या योजनांबाबत शेतकरी अनभिज्ञ आहेत. त्यामुळे त्यांना या योजनांपासून वंचित राहावे लागते. यासाठी खात्यामार्फत शासनाकडून येणाऱ्या योजनांविषयी माहिती देण्यात आली. यावेळी शेतकरी, पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.









